डोर्लेवाडी : बारामती तालुक्यातील वाहणाऱ्या कऱ्हा नदीवरील डोर्लेवाडीतील पुलाला भले मोठे झाड अडकल्याने कऱ्हा नदीचे पाणी आठवड्यापूर्वी ओसरूनही पूल वाहतुकीसाठी बंदच आहे. यामुळे डोर्लेवाडी गावातील मात्र नदी पलीकडील राहणाऱ्या नागरिकांना डोर्लेवाडी गावात येण्यासाठी बारामती वरून ये जा करावी लागत आहे. यामुळे या नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जात असून मानसिक त्रासाला देखील सामोरे जावे लागत आहे. यामुळे पुलाला अडकलेले झाड लवकरात लवकर काढण्यात यावे अशी मागणी नागरिकाकडून केली जात आहे.
आठ दिवसापूर्वी परतीच्या पावसाने थैमान घातले होते. यामुळे कऱ्हा नदी दुथडी भरून वाहत होती मात्र पाऊस कमी झाल्याने नदीचे पाणी ओसरले मात्र तरी देखील बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील कऱ्हा नदीवर असलेला डोर्लेवाडी हद्दीत असलेला मेखलीकडे जाणारा पूल अद्यापही बंद आहे.
या पुलाला भले मोठे झाड अडकल्याने पाणी मोठ्या प्रमाणात पूलावरून वाहत आहे यामुळे या पुलावरील सर्व वाहतूक अद्यापही बंदच आहे. पूलाला अडकलेले झाड काढण्यासाठी डोरलेवाडी ग्रामपंचायत आणि स्थानिकांनी प्रयत्न केले आहेत मात्र झाड भले मोठे असल्याने काढण्यास अडचण निर्माण होत आहे.
यामुळे संबधित अधिकाऱ्यांनी लक्ष देत कऱ्हा नदीवरील अडकलेले झाड काढून नागरिकांसाठी पूल खुला करावा आणि डोर्लेवाडी गावातील नदी पलीकडे राहणाऱ्या नागरिकांची होत असलेली हेळसांड थांबवावी अशी मागणी नागिकांमधून होत आहे.