पुणे – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने (विद्या प्राधिकरण) “ज्ञानगंगा’ या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांसाठी डी.डी. सह्याद्री वाहिनीद्वारे सोमवारपासून (दि.14) शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
करोनामुळे राज्यामध्ये विविध निर्बंध लागू केले आहेत. यामुळे राज्यातील शाळा बंद असल्याने या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी डी.डी. सह्याद्री वाहिनीवरून सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये दररोज पाच तास इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण केले जाणार आहे.
सकाळी 7.30 ते दुपारी 3.30 या वेळेमध्ये काही नियोजित बातम्यांची वेळ वगळता हे प्रक्षेपित होणार आहे. प्रथम टप्प्यामध्ये इयत्ता दहावीच्या मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम तसेच इयत्ता बारावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान या तीनही शाखांच्या शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण सुरू करण्यात येत आहे. उर्वरित इयत्तांच्या तासिकांचे प्रक्षेपण लवकरच सुरू होणार आहे.
शैक्षणिक कार्यक्रमाच्या दैनिक प्रसारणाचे सविस्तर वेळापत्रक हे विद्या प्राधिकरणाच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर प्रदर्शित केले जाणार आहे. शैक्षणिक कार्यक्रमाचे दैनिक वेळापत्रक पाहण्यासाठी क्युरआर कोड स्कॅन करून अथवा क्लिक करून संकेतस्थळावरील वेळापत्रक पाहता येईल. डी.डी. सह्याद्री वाहिनी प्रक्षेपित होत असलेल्या विविध चॅनेल क्रमांकावर सर्व विद्यार्थ्याना शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रक्षेपण पाहता येणार आहे, अशी माहिती विद्या प्राधिकरणाचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.