बंगळूरू – तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटच्या सहकारी शशिकला बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सध्या येथील कारागृहात आहेत. त्यांना चार वर्षे कैदेची शिक्षा झाली आहे. मात्र आता आपली सुटका कधी होणार याची माहिती कोणाही त्रयस्थ व्यक्तीतला दिली जाउ नये, असे शशिकला यांनी म्हटले आहे.
त्यांनी यासंदर्भात कारागृहाच्या प्रशासनाला पत्र पाठवले आहे. आपली प्रायव्हसी जपण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार असल्याकडे लक्ष वेधत आपल्या सुटकेच्या संदर्भात माहिती अधिकाराच्या नावाखाली कोणाही त्रयस्थ व्यक्तीला माहिती दिली जाऊ नये अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.
शशिकला यांना तुरूंगातून कधी सोडणार याबाबत माहिती अधिकाराखाली विचारणा केली जात आहे. मात्र आपल्या सुटकेची तारीख जाणून घेत राजकीय सूडाच्या भावनेने ती प्रक्रिया गुंतागुंतीची करण्याचा किंवा पब्लिसिटी मिळवण्याचा हा प्रकार असू शकतो. त्यामुळे ही माहिती कोणालाही दिली जाऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.
शशिकला यांना 27 जानेवारी 2021 रोजी तुरूंगातून सोडले जाणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांतून अगोदरच झळकल्या असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पत्र पाठवले आहे.