लोकांच्या हाताचे काम काढून घेऊ नका; शरद पवारांचे सरकारला आवाहन

बारामती – मंदीच्या संकटामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत राहिले तर अनेकांच्या हाताला कामच राहणार नाही. मंदीचे संकट असले तरी खर्चात कपात करण्यासारखे उपाय करा; पण लोकांच्या हाताचे काम कोणीही काढून घेऊ नका, असे आवाहन मोदी सरकारला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची भाजी मार्केट येथील तीन कोटी रुपये खर्चून उभारलेल्या विस्तारीत नवीन भाजीपाला विक्री सेलहॉल येथील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती शौकत कोतवाल, उपसभापती शशिकला वाबळे, सचिव अरविंद जगताप यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले की, जोपर्यंत गुंतवणूक वाढत नाही तोपर्यंत मंदीच्या संकटातून देश बाहेर येणार नाही. क्रयशक्ती वाढत नाही तोपर्यंत व्यापार वाढणार नाही, व्यापार वाढत नाही तोपर्यंत मंदीवर मात करणे अवघड होते. अनेक क्षेत्रांना मंदीच्या संकटाची किंमत मोजावी लागते. आज पाच लाखांवर लोकांच्या हाताचे काम गेलेले आहे. मंदीमुळे आलेल्या संकटावर मात करताना अनावश्‍यक खर्च कमी करा, नोकरकपातीचा मार्ग शेवटचा उपाय म्हणून वापरा. नोकरकपातीने कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्‍न निर्माण होतील, अशी भीती पवार यांनी बोलून दाखविली.दरम्यान, एकीकडे महापुराने पिकाचे प्रचंड नुकसान व दुसरीकडे मंदीचा तडाखा अशा दुहेरी संकटात सध्या लोक सापडले आहेत. महापूर व दुष्काळ अशा दोन्ही बाबी एकाच वेळेस आल्याने व्यापार व व्यवहार मंदावला व सध्या एका दुष्टचक्रातून राज्याची वाटचाल सुरु आहे. पण यातून बाहेर पडण्यासाठी खर्च कमी करून संकटावर मात करू, असे आवाहन पवार यांनी केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×