मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर कहाणी दिवसांपूर्वीच (दि.11) ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर तसेच पुणे येथील कार्यालयांवर यावेळी छापे टाकण्यात आले होते. तब्बल 12 तास मुश्रीफांच्या घरी छापेमारी सुरू होती. सकाळी सात वाजता सुरू झालेला तपास सायंकाळी सात वाजता संपला. यानंतर राज्यभरातून विरोधी पक्ष नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येण्यास सुरुवात झाली होती.
दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीची छापेमारी झाल्यानंतर पाच दिवसांमध्येच किरीट सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी “काही मंत्र्यांवर कारवाई झाली आहे, काहींवर होत आहे, म्हणून शक्ती मागण्यासाठी आलो आहे. कारवाई झाल्यानंतर हसन मुश्रीफांना धर्म आठवला. मात्र, आता कारवाई सुरु झाली आहे’. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली होती.
मात्र, आता या आरोपांना हसन मुश्रीफ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. “माझा जावई एमआयडीसीतील छोटा कारखानदार आहे. ब्रिक्स कंपनी किंवा आरोप केले जात असलेल्या जीएसटी सल्लागार कंपनीशी त्याचा कोणताही संबंध नाही. माझा जावई यात कोठे आढळला तर मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे… पण ज्यांचा कोठे संबंध नाही अशा कुटुंबावर नाहक शिंतोडे उडवू नका”. असं मुश्रीफ म्हणाले.