रिक्षांमधून पाल्यांना शाळेत पाठवू नका!

वाहतूक करण्याची परवानगी नाही : पालकांनी दक्षता घेण्याचे आरटीओचे आवाहन

पुणे – ऑटोरिक्षांमधून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करणे धोकादायक असल्याने पालकांनी ऑटोरिक्षांमधून पाल्यांना पाठविताना दक्षता घ्यावी. पालकांनी आपल्या पाल्यांसाठी अधिकृत स्कूल बसेसचा वापर करावा. त्यांना विनापरवाना वाहनांतून शाळेत पाठवू नये, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षांना स्कूल बस म्हणून परवानगी देण्यात येत नाही. पुणे प्रादेशिक कार्यालयातून देखील अद्याप कोणत्याही ऑटोरिक्षा मॉडेलला परवानगी दिली नसल्याची माहिती कार्यालयाकडून देण्यात आली. त्यामुळे वाहनातून क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांची वाहतूक होणार नाही, याची वाहतूकदार आणि पालकांनी खबरदारी घ्यावी. कारवाई करतेवेळी विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्यास आरटीओ जबाबदार नसल्याचे म्हणत प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे.

रिक्षांमधून होणारी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षिततेबाबत मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या निर्णयानुसार उच्च न्यायालयाने परिवहन आयुक्तांना रिक्षांवर कारवाई करण्याबाबतचा आदेश जारी केला होता. त्यानुसार राज्य परिवहन कार्यालयाकडून सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आदेशाप्रमाणे शहरामध्ये कारवाई सुरू असल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आता पालकांना “दक्षता’ घेण्याचे आवाहन केले आहे.

विद्यार्थी वाहतुकीचे परवाने घ्यावेत
बस कंत्राटदाराबरोबर सामंजस्य करार करणे बंधनकारक असल्याच्या सूचना आरटीओ प्रशासनाने शाळा प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच विनापरवाना शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये. शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांनी स्कूल बस नियमावलीची पूर्तता करून त्वरित विद्यार्थी वाहतुकीचे परवाने घ्यावेत, असे प्रशासनाकडून वाहनमालकांना सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.