तळेगाव ढमढेरे -गावातील भाजीपाला विक्रेते आणि किराणा दुकानदारांनी त्याचबरोबर गावात विनाकारण गर्दी करणाऱ्या नागरिकांनी नियमाचे पालन करावे अन्यथा आम्हाला कायदेशीर कठोर कारवाई करावी लागेल, असा इशारा कंट्रोल कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भराटे यांनी दिला आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावातील सामाजिक कार्यकर्ते, किराणा व रेशन दुकानदार, बॅंक प्रतिनिधी, दूध डेअरी मालक-विक्रेते, भाजीपाला व फळ विक्रेते, शेतकरी व गावातील नागरिक या सर्वांशी चर्चा करण्यासाठी करोना नियंत्रण कमिटीने मिटींगचे आयोजन सावतामाळी मंगल कार्यालयात केले होते. यावेळी शिक्रापूरचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र माळी, ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर, यांसह पदाधिकारी उपस्थित होते. नागरीक व व्यापारी यांच्या अडचणी ऐकून घेऊन सूचना करण्यात आल्या.
उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी काढलेल्या परिपत्रकात शिरूर तालुक्याचा रेड झोनमध्ये समावेश केला आहे. तसेच शिक्रापूर परिसरात करोनाचे रुग्ण आढळून आल्याने आणि लागूनच असणाऱ्या तळेगाव ढमढेरे या दोन गावांचा कंटेन्मेंट क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर परिसरातील सुमारे पाच रुग्ण आढळले आहेत. शिरूर तालुक्यातील प्रतिबंध क्षेत्रांमध्ये समावेश झाल्यामुळे दवाखाना औषध दुकाने सोडून सर्व दुकाने बंद राहणार आहे. याबाबतची माहिती नागरिकांना दवंडी द्वारे देण्याची सूचना या परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
किराणा घरपोच द्यावा
गावातील सर्व किराणा दुकानदारांना होम डिलिव्हरी देणे बंधनकारक केले आहे. शेतीसाठी औषधे, बी-बियाणे आणि मेडिकल वगळून सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. भाजीपाला आठवड्यातून दोन दिवस सोमवार व शुक्रवार सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. इतर वेळी भाजीपाला विक्री करण्यास मनाई आहे या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे.