सरकार आले म्हणून हुरळून जाऊ नका :अजित पवार 

पक्ष संघटनेला ताकद देण्यासाठी काम करा

पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची ताकद असलेला, पंधरा वर्षे पालकत्व स्वीकारलेल्या पुण्यात जिल्हा परिषद सोडली, तर दोन्ही महानगरपालिकेत पक्षाला मोठा फटका बसला. ही खंत अनेक महिन्यांपासून मनात होती. एवढेच नव्हे, तर विरोधकांकडून “राष्ट्रवादी कॉंग्रेस औषधालाही उभे राहणार नाही’ अशी टीका केली गेली. मात्र, निकाल लागला आणि पक्षाला चांगले दिवस आले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार आले, पण आपण हुरळून जाता कामा नये, असा सल्ला देत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी काम करा, असे माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार अजित पवार यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सांगितले.

“विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष अडचणीत असताना अनेकजण पक्षाला सोडून गेले, त्यांना “रेड कार्पेट’
टाकू नका, जरा सबुरीने घ्या’ असे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यावर पवार म्हणाले, “आम्ही नक्कीच त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकणार नाही, परंतू, नंतर तुम्हीच “आता तो सुधारलाय, त्याला त्याची चूक कळली’ असे म्हणून पक्षात घ्यायला लाऊ नका. कारण, उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे अनेकजण आहेत. ती निगरगट्ट आणि गेंड्याच्या कातडीची असतात. त्यामुळे पक्ष, आपल्या नेत्यासाठी मर मर राबतो, आमदार निवडून आणायला मदत करतो तोच बाजूला राहतो. त्याच्याआधीच दुसरा येऊन “मी कसा चांगला’ असे दाखवतो.

यावेळी पक्ष सोडून गेलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे, प्रदीप कंद यांच्यावर पवार यांनी निशाणा साधला. “कामठे यांना झेडपी आणि जिल्ह्याचे अध्यक्षपद दिले तरी त्याची सटकली आणि तो गेला. त्यामुळे पुरंदर आणि हवेलीची जागा यायला मदत झाली. काही लोक आपल्याजवळ राहिली, मात्र ती पक्षाला मदत करत नसतात तर ओझे असते. ते आज कमी झाले. काही बहाद्दरांना जाऊ नका असे म्हटले तर “आमची चर्चा मुख्यमंत्र्यांबरोबर झाली आता मागे येणार नाही,’ असे त्यांनी सांगितल्याचे पवार म्हणाले.

बाकीच्या कार्यकर्त्यांनी काय सतरंज्या उचलायच्या का?
“त्यांना विधानपरिषदेवर घ्या’ असे एक कार्यकर्ता मेळाव्यात म्हटल्यावर, “बाकीच्यांनी काय सतरंज्या उचलायच्या का?’ असा शब्दांत सुनावत अजित पवार भडकले. उगाच काहीही बोलून चिडायला लावू नका, असे म्हणत विधानसभेचे तिकीट देऊनही बदाबदा पडतात, ज्यांना संधी दिली त्यांनी त्या संधीचे सोनं करण्याऐवजी राख केली. सगळंच त्यांना द्यायचे म्हटल्यावर तिकीट वाटपावेळी शांत राहण्यासाठी ज्यांना ज्यांना शब्द दिला, त्यांना काय चुना देऊ का, अशा शैलीत पवार यांनी समाचार घेतला. ज्याने जीवाचे रान केले, पक्षाला ताकद दिली त्या अमोल मिठकरींना विधानपरिषदेवर घेण्यासाठी पक्षाकडे नक्की मागणी करेन, असे पवार म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)