पुणे – विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे सोमवारी सकाळी अपहरण करुण खून करण्यात आला. या प्रकरणानंतर टिळेकर यांनी पुणे पोलिसांवर विश्वास दाखवत घटनेचे राजकारण न करता पोलिसांची बाजू समजावून घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
वाघ यांचा मृतदेह यवत येथील शिंदवणे घाटाच्या मोकळ्या जागेत टाकण्यात आला होता. सायंकाळी उशीरा पोलिसांना मृतदेह हाती लागला. त्यांच्या अंगावर एक धारदार शस्त्राचा वार आढळून आला आहे. अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या जीवाला काही धोक होऊ नये म्हणून तपासाबाबत गुप्तता बाळगली होती. मात्र अखेर त्यांचा खून झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनाही धक्का बसला.
आता पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. दरम्यान टिळेकर यांनी मामाच्या घरी भेट देऊन कुटूंबाचे सांत्वन केले. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “काही तासांतच पोलीस याचा सुगावा लावतील, सध्या आमचे कुटूंब खुप दु:खात आहे. याचे लगेचच राजकारण करता कामा नये.
आमदाराचा मामा असो किंवा सर्वसाधारण कुटूंबातील व्यक्ती. प्रत्येकाला आपल्या कुटूंबात अशी घटना घडल्यावर आघात होतो. त्यावेळेस राजकारण न करता पोलिसांची बाजू समजावून घेणे आवश्यक आहे. त्यांना आमचा परिवार पुर्ण सहकार्य करतोय, त्यांच्यावर आमची कोणतीही शंका नाही. पोलीस खुप चांगल्या पध्दतीने काम करत आहेत. शेवटी गुन्हेगार काम करताना शातीर पध्दतीने काम करत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे टिळेकर म्हणाले, “शेवटी ही यंत्रणा आहे. तपास लावत असताना तो भक्कमपणे लावला पाहिजे अशी भुमिका पोलीस कायम घेत असतात. यामुळे माझी खात्री आहे, सरकार चांगले काम करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या सामान्य नागरिकावर जरी अत्याचार झाला तरी त्याला आधार देणारे एक नेतृत्व आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीतही सरकार तेवढ्याच संवेदनशिलपणे काम करत आहे.”