पुणे – ‘पब्जी’ गेम खेळण्यासाठी मोबाइल न दिल्याने एकावर कोयत्याने वार करण्यात आला. हडपसर येथील लोखंडी पुलाशेजारी ही घटना घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी हेमंतसिंग रजपूत (वय 24, रा. महंमदवाडी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार सनी पांडुरंग लोंढे (वय 18), विशाल तांबे, जिंजे यांना अटक करण्यात आली असून करण वानखेडे (वय 22, दोघेही रा. डवरीनगर, लोखंडी पुलाजवळ, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंतसिंग व सुनील माने (वय 19, रा. मांजरी रस्ता) हे मित्र आहेत. हेमंतसिंगकडे करण वानखेडे याने पब्जी खेळण्यास मोबाइल मागितला. यावेळी सुनीलने नकार दिला. त्यामुळे आरोपी व सुनील यांच्यात बाचाबाची सुरू झाली. त्यावरुन करण वानखेडे याने “सुनीलला आज खल्लास करू, याला जिवंत सोडायचा नाही’ असे म्हणून त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले.