पुणेः जानेवारी महिन्यापासून शहरात गुइलेन बॅरी सिंड्रोम जीबीएस आजाराने डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. जीबीएसची रुग्णसंख्या वाढत असून आता या आजाराची लागण झालेल्या आणखी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
या आजाराची लागण झालेल्या ३७ वर्षीय आणि त्यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णावर पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात उपचार सुरू होते. ९ फेब्रुवारी या दिवशी जीबीएस बाधित रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता जीबीएस आजाराच्या एकूण मृत्यांची संख्या सातवर जाऊन पोहचली आहे, तर राज्यातील जीबीएस बाधीत आजाराची एकूण रुग्णसंख्या १९२ झाली आहे.
जीबीएस आजाराने बाधित होणाऱ्या रुग्णांची वाढ ही सुरूच आहे. राज्यातील आत्तापर्यंत जीबीएस आजाराचे १९२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १६७ रुग्णांना जीबीएसचे निदान झाले आहे. पुणे महापालिका ३९, महापालिकेत नव्याने समाविष्ट गावात ९१, पिंपरी-चिंचवड महापालिका २९, पुणे ग्रामीण २५ अशी रुग्णसंख्या आहे.
राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये जीबीएसचे आतापर्यंत ८ रुग्ण आढळून आले आहेत. ४८ रुग्णांवर आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत. २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर ९१ रुग्णांना डीस्चार्ज देण्यात आला आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
प्रकृती बिघडल्याने मृत्यू
या आजाराने मयत झालेल्या रुग्णाला ३१ जानेवारीपासून अशक्तपणा जाणवत होता. हा रुग्ण बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगरमधील रहिवासी होता. त्याला पुण्यातील भारती रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याला १ फेब्रुवारीला सांगलीतील भारती रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याची प्रकृती आणखीच बिघडल्याने त्याला पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णाला ५ फेब्रुवारीला या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.