Nagar | विरोधाला विरोध करू नका, विकासासाठी एक व्हा : आ. काशिनाथ दाते

पारनेर, – माझी जनता आणि मतदारसंघात करावयाचा विकास हेच माझं ध्येय असणार आहे. तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. विकासाभिमुख कामांना पाठबळ देऊन मतदारसंघात विकासकामे झाली पाहिजे, ही आपली भावना असून मतदारसंघाचा विकास करण्यासाठी सर्वर्तोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार काशिनाथ दाते यांनी दिली.
निघोज ग्रामस्थांच्या वतीने आमदार काशिनाथ दाते यांचा भव्य सत्कार समारंभ व मतदारांचे आभार आयोजन कार्यक्रम प्रसंगी आमदार दाते बोलत होते. यावेळी जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, प्रभाकर कवाद, सचिन पाटील वराळ, पारनेर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक ॲड बाळासाहेब लामखडे, युवा नेते रोहिदास लामखडे, सागर मैड, पंकज कारखिले, विक्रम कळमकर, राजाराम एरंडे, सुधामती कवाद, भास्कर उचाळे, सरपंच चित्राताई वराळ, उपसरपंच माऊली वरखडे, मनोज मुंगसे प्रमुख उपस्थित होते.
आ. दाते म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात अहंकार हा चालत नाही, लोकशाहीमध्ये अहंकार करणाऱ्याची जनता वाट लावल्याशिवाय राहत नाही. जनता डोक्यावरही घेते आणि जमिनीवरही आणते. बारा- झिरो करण्याची भाषा करणाऱ्यांना लोकांनी जमिनीवर आणले. मी फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली. निघोजमध्ये विकासाची सर्व कामे करून देईन हा अजित दादाचा वाद आहे, तो पक्का असतो, तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. माझी जनता आणि माझे मतदारसंघात करावयाचा विकास हेच माझं ध्येय असणार आहे. तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. आपणाला शांततेने राजकारण करायचे आहे. उद्याच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला असेच यश द्या, असे आवाहनही आमदार दाते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद ठुबे यांनी केले. उपसरपंच माऊली वरखडे व रोहिदास लामखडे यांनी आभार मानले.
सत्तेचा दुरुपयोग केला म्हणून लोकांनी तुम्हाला डोक्यावरून खाली सोडले. पाच महिन्यापूर्वी लोकांनी तुम्हाला निवडून दिले होते, पारनेर तालुका हा वैचारिक आहे. भल्याभल्यांना लोकांनी जागा दाखवली, तीच गत तुमची झाली. मा. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभवाचे शल्य आम्ही कधीही विसरू शकत नाही. दाते सर आपण विजयी झाल्याचा सर्वात जास्त आनंद आम्हाला झाला, कारण आमच्या नेत्याच्या पराभवाचा बदला आम्ही घेतला.
– सचिन पाटील वराळ, युवा नेते, निघोज.





