तात्पुरती मलमपट्टी नको, नवा रस्ता करा

पोखरी घाट बनलाय धोकादायक ः बांधकाम विभागाचा काणाडोळा होत असल्याचा आरोप

मंचर (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्‍याच्या पश्‍चिम आदिवासी भागातील मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील पोखरी घाटातील रस्त्याची तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकदा निवेदने दिली आहेत; मात्र, अपघात झाल्यानंतर संबंधित यंत्रणा तात्पुरती डागडुजी करून नवीन डांबरी रस्ता करण्याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप स्थानिक आदिवासी नागरिकांनी केला आहे.

पोखरी घाटात अनेक धोकादायक वळणे व अरुंद रस्ता आहे. पहिल्याच पावसात रस्त्यावर खड्‌डे पडले असून घाटात दरड कोसळली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून घाटातील रस्त्यावर पावसाचे व धबधब्यांचे पाणी येऊ नये. याकरिता डोंगरालगत बुजलेली गटारे जेसीबी, पोकलॅन व ट्रॅक्‍टरच्या साह्याने खोल करण्यास सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी अति पावसाने पाणी रस्त्यावर येते. त्याठिकाणी सिमेंट पाईप आणून पूल बांधण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आदिवासी बांधव व वाहनधारकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

पोखरी घाट, भीमाशंकर, आहुपे, आसाणे व पाटण परिसरात दरवर्षी पावसाळ्यात मुसळधार पाऊस होतो. पोखरी घाटात पावसाचे पाणी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येते. त्याठिकाणी रस्ता पूर्णपणे खराब झाला असून वाहून गेलेल्या साइडपट्ट्यांमुळे आणखीच भर पडली आहे. रस्त्याच्या दुतर्फा संरक्षक कठडे नसल्याने अपघात होण्याची शक्‍यता आहे. कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकदा निवेदने दिली आहेत; मात्र अपघात झाल्यानंतर संबंधित यंत्रणा तात्पुरती डागडुजी करुन नवीन डांबरी रस्ता करण्याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप स्थानिक आदिवासी नागरिकांनी केला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करणे जोखमीचे होणार असल्याचे आदिवासी बांधव व वाहनचालकांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.