जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची प्रशासकीय यंत्रणेला सूचना
मांजरी (प्रतिनिधी) –मांजरी बुद्रुक गावातील स्थिती हाताबाहेर जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. गावात जर कोणी नियम पाळत नसेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करावा. गावपातळीवरील प्रशासकीय यंत्रणांनी गावातील करोना विषयक आकडेवारी रोजच्या रोज अद्यावत करुन ठेवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यंत्रणेला दिल्या. हवेली तालुक्यातील मांजरी बुद्रुक येथील कृष्णाजी खंडूजी घुले विद्यालयात करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी आमदार चेतन तुपे, उपविभागीय अधिकारी सचिन बारावकर, तहसीलदार सुनील कोळी, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, हडपसरचे पोलीस निरीक्षक रमेश साठे, सहायक पोलीस निरीक्षक मनोज पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा देशपांडे, सरपंच शिवराज घुले, जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले, उपसरपंच सुवर्णा कामठे, ग्रामसेवक मधुकर दाते, समन्वयक ए. बी. मोर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले की, मांजरी बुद्रुक गाव शंभर टक्के करोनामुक्त करण्यासाठी भर द्यावा. यासाठी प्रशासकीय यंत्रणेने शासनाने घालून दिलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करावी. आमदार चेतन तुपे म्हणाले की, शेतकऱ्यांना व्यावसायासाठी मार्केट कमिटीमध्ये जागा दिली तर चांगले होईल. करोना बाधितांच्या संपर्कात येणाऱ्यांचा शोध घेण्यावर भर दिला पाहिजे, यामुळे मांजरी गाव निश्चित शून्यावर येईल.
पोलिसांची मदत मिळावी : सरपंच घुले
गावाची लोकसंख्या एक लाखाच्या जवळपास आहे. शहरात जाणारा कामगार वर्ग मोठा आहे. त्यामुळे गावात संसर्ग वाढण्याचा धोका मोठा आहे. येत्या काळात होणाऱ्या लॉकडाऊनसाठी गावातील पोलीस प्रशासनाची मदत आवश्यक आहे. त्यांनी ही मदत पुरविल्यास संसर्ग रोखण्यास मोठी मदत होईल.