तंत्रशिक्षण विभागाच्या संबंधित संस्थांना सूचना
पुणे (प्रतिनिधी) – तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व पदवी, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. मात्र हे अर्ज अजून महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असून, येत्या तीन दिवसांत सर्व प्रलंबित विद्यार्थ्यांचे अर्ज निकाली काढावेत, अशा स्पष्ट सूचना तंत्रशिक्षण विभागाने संबंधित संस्थांना दिले आहेत.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाहभत्ता योजना आणि राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, ह्या तीन शिष्यवृत्ती योजना तंत्रशिक्षणच्या खुल्या प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येते. शैक्षणिक वर्ष 2019-20 च्या महाडीबीटी पोर्टलवर या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेले ऑनलाईन अज मुदतीत संस्थांनी तपासणी केले नाहीत.
अद्यापही अर्ज संस्थांच्या लॉगीनमध्ये प्रलंबित आहेत. या अर्जामधील त्रुटींची पूर्तता करून अर्ज संस्थांनी तपासणी करून दि. 26 मेपर्यंत निकाली काढावेत. विद्यार्थ्यांचे अर्ज संस्थास्तरावर प्रलंबित राहिल्यास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी संस्थांची राहील, असेही पुणे विभागीय तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. डी. आर. नंदनवार यांनी सांगितले आहे.