पीक कर्ज देण्यास टाळाटाळ नको

कृषीमंत्री दादा भुसे; बॅंक अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश

पुणे – करोना काळात बॅंकांमध्ये गर्दी होऊ नये, यासाठी पीक कर्ज मागणीसाठीचा एक पानी अर्ज बॅंकेमध्ये ऑनलाइन सादर करुन त्यावर कार्यवाही करण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत उपलब्ध करुन द्यावे. पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅंकाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे आदेश कृषीमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

खरीप हंगाम नियोजनाबाबत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कृषी मंत्री भुसे यांनी पुणे विभागाचा जिल्हानिहाय आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. बैठकीला कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, विभागीय कृषि सह संचालक दिलीप झेंडे, दशरथ तांभाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, जिल्हा अग्रणी बॅंकेचे अग्रणी व्यवस्थापक आनंद बेडेकर उपस्थित होते.

यावेळी भुसे म्हणाले की, खरीप हंगामासाठी कृषी क्षेत्राशी संबंधित कोणत्याही बाबींची अडचण शेतकऱ्यांना येणार नाही, यासाठी संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांकडे उपलब्ध असणारा कापूस, तूर, मका, ज्वारी, हरभरा आदी शेतमाल येत्या 15 जून पर्यंत खरेदी करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करावी. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचाच माल येत असल्याची पडताळणी करावी.

करोनाच्या संकटात लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांनी शेतमाल व फळपिके नागरिकांना कमी पडू दिले नाही. यात बळीराजाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे गौरवोद्गगार काढून भुसे म्हणाले की, या काळात शेतकऱ्यांचा 2 हजार टन शेतमाल ग्राहकांपर्यत पोहोचविण्याचे काम कृषी विभागाने केले आहे. या कामाचे कौतुक करुन येणाऱ्या काळात कृषी क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.

खते आणि बियाणे बांधावर पोहोच…
शेतीसाठी युरियाचा 50 हजार मेट्रिक टन साठा राज्यात उपलब्ध आहे. तथापि जमिनीचा पोत चांगला राहण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्‍यक तेवढाच व कमीत कमी युरियाचा वापर करावा, असे सांगून याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांच्या बांधावर आतापर्यंत 96 हजार 900 मेट्रीक टन रासायनिक खते तसेच 46 हजार 655 क्विटंल बियाणे पोहोचवण्यात आली आहेत. या योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे कृषी मंत्री भुसे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.