नकोशी आणि नकोसा

माझ्या घराची वास्तुशांती होती. चार दिवस तयारीत गेले. पूजेच्या आदल्या दिवसापासून घर गजबजून गेलं. त्यात माझी आई होती, बहीण होती, भावजया होत्या, पुतण्या होत्या. सगळ्याच हव्याहव्याशा वाटत जन्माला आल्यासारख्या. कुटुंबावर, मुलांवर आपापल्या संसारावर मनापासून प्रेम करणाऱ्या. असं असतानाही कुठेतरी कोणीतरी कुणालातरी “नकोशी’ असते. म्हणून जन्म झाल्या झाल्या, तळहाताएवढ्या तिला, तिचे जन्मदातेच कुठेतरी अडगळीत फेकून देतात. भल्या माणसाच्या रूपात देव धावून आला तर एखाद्या गोकुळात त्या लहानाच्या मोठ्या होतात. नाहीतर टाहोफोडत गतप्राण होतात. गावोगावी नकोशीच्या कथा जन्म घेतात.

प्रकाशनाच्या वाटेवर असणाऱ्या माझ्या “तमोहरा’ या कादंबरीतील नायिका देखील अशीच. मुलगी झाली म्हणून जन्मदात्यांनी टाकून दिलेली. त्यातूनही ती जगते. मोठी होते. शिकते. स्वतःच्या पायावर उभी राहते. आई वडिलांना “नकोशी’ होती म्हणून, त्यांनी तिला टाकून दिलं. परंतु आपल्या मुलासाठी बायको हवी, आपल्याला सून हवी म्हणून ती कोणालातरी “हवीशी’ वाटते. ते तिला स्वीकारतात. पण त्यानंतर तरी तिचे भोग संपतात का? तिच्या पोटी एकामागून एक तीन “नकोशा’ जन्माला येतात. तेव्हा ती काय करत असेल? पदराखाली घेऊन वाढवत असेल की कुठेतरी अडगळीत फेकून देत असेल? त्या नकोशांच्या आयुष्यात काय होत असेल? याची कहाणी म्हणजे “तमोहरा’.

समाजाला मुलगी नको असते. परंतु तिच्याशिवाय जन्म साध्य नाही हे वास्तव नजरेआड होते. आयुष्याची जोडीदारीण म्हणून पत्नी हवी असते. पण मुलगी नकोशी वाटते? असं का? अगदी आजही तिच्यावर अत्याचार होत असल्याच्या बातम्या वर्तमान पत्रातून झळकतात तेव्हा काळजाला चिरा पडतात. जिला आपण आदिमाया म्हणतो, आदिशक्ती म्हणतो, विश्वाची जननी मानतो, तिची विटंबना बघून मन आक्रोश करतं. “आ’ म्हणजे आत्मा आणि “ई’ म्हणजे ईश्वर ही आईची फोड सांगायला किती गोड वाटते. ईश्वराला प्रत्येकाची काळजी घ्यायची होती. परंतु एकाचवेळी तो सगळ्या जीवांची सोबत करू शकत नव्हता. एकाचवेळी सगळ्यांवर मायेची पाखर घालू शकत नव्हता. म्हणून ईश्वराने घराघरात आईच्या रूपात जन्म घेतला. “आईमध्ये ईश्वरी आत्मा असतो’ हे सांगायला किती मनोहर. परंतु ईश्वरी अंश असणाऱ्या तिच्यावर अन्याय करणाऱ्या नराधमांना, जन्मताच तिचा त्याग करून तिला बेवारस करणाऱ्या तिच्या जन्मदात्यांना, तिच्यातला ईश्वर का दिसत नाही?

असो, तर माझ्या घराची वास्तुशांती होती म्हणून सगळे सगेसोयरे घरात जमा झाले होते. घर पहाटे चारलाच जागं झालं. सगळ्यात आधी “नकोशा’ उठल्या. आंघोळीपांघोळी झाल्या. मग आळोखेपिळोखे देत एक एक “हवेसे’ उठले. सात वाजताच आवरून आमचं आवरलं. आम्ही गुरुजींची वाट बघत बसलो. आठ वाजता गुरुजी आले. पूजा मांडली. देवांना अभिषेक झाला. सत्यनारायण झाला. होम झाला. आणि पत्नीने गुरुजींना विचारलं, “”गुरुजी देवघरात काही देव, दोन-दोन आहेत. काय करू?” आमचे गुरुजी तसे शास्त्रसंपन्न. त्यांनी सगळ्या मूर्ती आणि देवघरातले फोटो न्याहाळले. आणि म्हणाले, “”हे तीन देव, देवघरात नाही ठेवले तरी चालतील?”
“”मग काय विसर्जन करायचं का त्यांचं?”
“”विसर्जन नका करू. शहरातल्या नद्या म्हणजे गटारगंगा आहेत. त्यात पाय धुवायचे म्हटलं तरी आपल्याला किळस येते. मग अशा नदीत देव विसर्जन करून कसं चालेल?”
“”मग काय करायचं?” माझ्या पत्नीची शंका.
“”एखाद्या देवळात सोडून या.” असं सांगून गुरुजी निघून गेले. दुसऱ्या दिवशी घरातल्या देवांची पूजा झाली. नकोसे असलेले ते तीन देव तोंड बारीक करून अंघोळीशिवाय, धूप-दीपाशिवाय एका कोपऱ्यात बसून राहिले. मनात आलं माणसाला देव सुद्धा “नकोसा’ होतो ना? घरातले पाहुणे गेले. मग एकांत बघून पत्नी म्हणाली, “”अहो, येता ना देव सोडून?”
“”हो, पण कुठल्या देवळात सोडणार?” सर्वच बायकांना नेहमीच सगळ्या गोष्टींचा हिशोब हवा असतो

तो प्रश्न माझ्यासमोरसुद्धा “आ’ वासून उभा होता. “”असे कसे कोणत्याही देवळात देव ठेवून यायचे? आपण गजबजाट असणाऱ्या देवळात देव सोडायला गेलो तर तिथला पहारेकरी मला बघू शकतो. पुजारी नकार देऊ शकतो. आणि अगदीच पुजाऱ्याचा, पहारेकऱ्याचा डोळा चुकवून, अशा गजबजाट असणाऱ्या देवळात देव सोडून यायचं म्हटलं तरी, भक्तांच्या गर्दीतलं कोणी ना कोणी मला बघणारच. कारण गर्दीला हजार डोळे असतात. माझे दोन डोळे कुठे कुठे लक्ष ठेवणार?” त्यामुळे साहजिकच एखादं गावकुसाबाहेरचं देऊळ शोधण्याचा मी विचार करतो आहे. गर्दी नसणारं, शुकशुकाट असणारं देऊळ शोधतो आहे. मांजरीचं पिल्लू पोत्यात घालून दूर घेऊन जायचं आणि दुसऱ्या गावाच्या वेशीवर सोडून पोबारा करायचा. तसंच काहीसं मला करावं लागणार आहे, हे मला स्पष्ट दिसू लागलं आहे.

मला कुंतीने सोडून दिलेला कर्णसुद्धा आठवला. परंतु कुंतीला कर्ण “नकोसा’ होता असं नव्हतं. कुंती कुमारिका होती आणि ती कुमारिका असताना कर्णाने कुंतीच्या पोटी जन्म घेतला होता. “ती’ असो वा “तो’, चूक जन्म घेणाऱ्याची नसतेच. आपल्या चुका आपण जन्म घेणाऱ्यांच्या माथी मारत असतो.
मी देवाच्या तसबरी सोडून देताना दहा वेळा विचार करतो आहे. मग लोक आपल्या पोटाच्या गोळ्याला आडरानात कसे फेकून देत असतील? असा विचार करत मी देवांच्या तसबिरीकडे बघत बसलो आहे…

– आरसा
-विजय शेंडगे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.