गाफील राहून चालणार नाही, निर्बंध कठोरपणे राबवा : मुख्यमंत्री ठाकरे

 विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्‍तांशी चर्चा


अधिकाऱ्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक

पुणे – गेल्या वेळेस आपण करोनाचा संसर्ग रोखून दाखवला होता. मात्र, आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे. त्यामुळे “ब्रेक द चेन’मधील निर्बंधांची अतिशय काटेकोर अंमलबजावणी होईल, याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या.

ठाकरे यांनी बुधवारी राज्यभरातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली.

यावेळी राज्य शासनाने दुर्बल घटकातील व गरीब लोकांसाठी जाहीर केलेले आर्थिक सहाय व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचावे तसेच कोणत्याही तक्रारी येणार नाही यादृष्टीने चांगले नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. 

मुख्यमंत्री म्हणाले, करोना विषाणूचे म्युटेशन झालेले आपल्याकडील नमुन्यांमध्ये आढळले आहे. गेल्या वर्षीपेक्षा संसर्गाचा वेग खूप जास्त आहे. तरुण पिढी जास्त संसर्गित झाली आहे. ऑक्‍सिजन उपलब्ध करून घेण्यासाठी आपण युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहोत. बदललेल्या उपचार पद्धतींबाबत जिल्ह्यांच्या डॉक्‍टर्सनी नेमकेपणाने काय करायचे, ते राज्याच्या तज्ज्ञ टास्क फोर्सकडून समजून घ्यावे.

ऑक्‍सिजनचा उचित व योग्य वापर तसेच रेमडेसिविरसंदर्भात काळजीपूर्वक पाऊले उचलावी लागतील. तसेच आपण उभारलेल्या जम्बो सुविधा या येणारा पावसाळा, वादळे लक्षात घेऊन सुरक्षित आहेत किंवा नाही ते तपासून घ्यावे. सर्व रुग्णालयांचे अग्निसुरक्षा ऑडिट त्वरेने पूर्ण करून घ्यावे. सूक्ष्म आणि लहान कंटेनमेंट क्षेत्रांकडे विशेष लक्ष द्यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्याच्या टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, शशांक जोशी, तात्याराव लहाने यांनीदेखील रेमडेसिविरचा अनावश्‍यक वापर टाळावा हे सांगतांना ऑक्‍सिजन सांभाळून व गरजेप्रमाणेच वापरावा हे सांगितले. एचआरसीटी तपासण्या तसेच प्लाझ्मावापर याबाबतीतही त्यांनी मार्गदर्शन केले.

आपण कडक निर्बंध लावले आहेत. त्यांची चांगली अंमलबजावणी होईल हे पाहताना आपला मुख्य उद्देश हा कोविडची संसर्ग साखळी तोडणे हा आहे, हे लक्षात ठेवावे. कुठलाही अतिरेक किंवा विसंगत कृती करू नये. कोणतीही शंका असल्यास मंत्रालयाला तातडीने मार्गदर्शन मागावे.
– सीताराम कुंटे, मुख्य सचिव

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.