पुणे – खासगी रुग्णालयांनी त्यांच्या ताब्यातील बेडस् स्वत:हून त्वरित करोना रुग्णांसाठी महापालिकेकडे द्यावेत, कारवाई करायला कोणीही भाग पाडू नये, असा इशारा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी खासगी रुग्णालयांना दिला आहे.
बाधितांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी आता हेल्पलाइनवर सुरू झाल्या असून, वाढती रुग्णसंख्या आणि बेडचे नियोजन ही महापालिकेच्या दृष्टीने आता जिकिरीची गोष्ट झाली आहे. शहरातील रोजची तीन हजारांची वाढ पाहता यापैकी दोनशे ते तीनशे जणांना रूग्णालयांत दाखल करावे लागत आहे. त्यातील काही जणांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासते.
याशिवाय पुणे हद्दीबाहेरील, ग्रामीण भागातील गंभीर रुग्णही शहरात उपचारासाठी येत आहेत. त्यांनाही उपचार नाकारता येत नाही, त्यामुळे बेड कमी पडत आहेत. त्याची संख्या वाढवण्याची तारेवरची कसरत महापालिका सध्या करत आहे.
यासाठीच खासगी रुग्णालयांनी केंद्राच्या आदेशाप्रमाणे 80 टक्के बेड नियंत्रित करायचे आहेत. परंतु महापालिकेकडून रुग्णालये बेड नियंत्रित करत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ते बेड त्वरित उपलब्ध करून द्यावेत अन्यथा कारवाई करावी लागेल, असे महापौर म्हणाले.
सध्या, शहरात 2 हजार 900 ऑक्सिजन बेड आहेत. रुग्णांची वाढती संख्या पाहता भविष्यात हा ताळमेळ बसणार का असा यक्ष प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे.
शहरातील रुग्णालयात 4 हजार 352 बेड
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या कोविड डॅशबोर्डवर शहरातील 94 (सरकारी, महापालिका आणि खासगी) रूग्णालयांमध्ये करोनाबाधितांसाठी 4 हजार 352 बेड राखीव आहेत. यापैकी गुरूवारी सायंकाळपर्यंत 821 साध्या बेडपैकी 178 रिक्त होते तर 2 हजार 873 ऑक्सिजन बेडपैकी केवळ 311 बेड रिक्त होते. तसेच शहरात सध्या 291 पैकी 29 आयसीयू बेड, 367 पैकी 17 व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होते.