पुणे – मेडिकल प्रवेशासाठी अनिवार्य असलेली राष्ट्रीय स्तरावरील “नीट’ परीक्षेचा विषय प्रतिष्ठेचा बनला आहे. केंद्र व राज्य सरकारमध्ये “नीट’ परीक्षेवरून एकमत नाही. अशा स्थितीत 50 टक्के विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा पुढे ढकलावी, असे मत मांडले. तर 37 टक्के विद्यार्थ्यांनी “नीट’ परीक्षा दि.13 सप्टेंबरला व्हावी, असे मत व्यक्त केल्याची माहिती “डीपर’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
“डीपर’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात 3 हजार 560 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी जवळपास 50 टक्के विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुढे ढकलावी, असे वाटत आहे. तर साधारणपणे 37 टक्के विद्यार्थ्यांचा कल परीक्षा ठरलेल्या तारखेला घेण्याकडे आहे. उर्वरित 13 टक्के विद्यार्थ्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. यावरून अनेक विद्यार्थी परीक्षा पुढे ढकलण्याच्या बाजूने असल्याचे सर्वेक्षणातून दिसून येत आहे.
जेईई परीक्षा दि. 1 ते 7 सप्टेंबर, तर नीट परीक्षेची तारीख 13 सप्टेंबर आहे. या परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांनी केली आहे. मात्र, केंद्र सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे. हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचला. सध्या परीक्षा घेतल्यास अनेक विद्यार्थ्यांना करोनाची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या सर्वेक्षणात “विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्ष जानेवारी ते 31 डिसेंबर असे व्हावे का?’ असे विचारले होते. त्यापैकी 60 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी संमती दर्शविलेली आहे.