मुंबई : सत्तेत समान वाटा या आमच्या मागणीकडे दूर्लक्ष करून आम्हाला अन्य पर्यायांचा विचार करायला भाग पाडू नका असा इशारा शिवसेनेने सोमवारी दिला.
आम्ही भाजपाच्या उत्तराची वाट पाहू, असे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. पण आम्हाला दुसऱ्या पर्यायांचा शोध घेण्यास भाग पाडू नका. ते करण्याची आमची इच्छा नाही,असे विधान शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी सोमवारी केले. भाजपाने निवडणुकीपर्वी दिलेल्या आश्वासनांवर ठाम रहावे. त्यांनी (कॉंग्रेस -राष्ट्रवादी) फायली नष्ट करण्यासाठी मंत्रालयाला आग लावली, तशी तुम्ही आग लावाल पण सत्ता वाटपाच्या झालेला करार कसा खोडणार, असा सवाल त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
शिवसेना नेते दिवाकर रावते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमावारी मुंबईत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात जाऊन स्वतंत्रपणे भेट घेतली. त्यानंतर तासाभरातच राऊत यांनी हे विधान केले. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद देऊ केले आहे, असे समजते. मात्र, शिवसेना हा तोडगा स्वीकारण्याच्या मन:स्थितीत नाही. त्यामुळे सत्तेच्या समान वाट्याच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षात चढाओढ सुरू आहे.