गंगा मातेच्या कृपेने करोनाचा फैलाव होणार नाही; भाजप नेत्याचा अजब दावा

डेहराडून – देशभरात करोना रुग्णांची संख्या वाढली आहे. अनेक राज्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे.  काही शहरांमध्ये जमावबंदीसह रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे उत्तराखंडमधील हरिद्वार येथे कुंभमेळ्याचे आयोजन कऱण्यात आले आहे. त्यामुळे करोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. मात्र उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि भाजपनेते तीरथ सिंह रावत यांनी अजब दावा केला आहे.

कुंभमेळ्यात शाही स्नानासाठी हजारोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली आहे. त्याचवेळी कुंभमेळ्यातील सहभागी अनेक भाविकांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यावर रावत म्हणाले की, गंगा मातेच्या कृपेमुळे करोनाचा फैलाव होणार नाही. उत्तराखंडच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभमेळ्यातील १८ हजार १६९ भाविकांच्या चाचण्या करण्यात आल्या असून १०२ साधू आणि भाविक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

गंगा मातेच्या कृपेमुळे करोनाचा फैलाव होणार नाही. कारण गंगा नदी अविरतपणे वाहत असते. गंगा मातेचे आशीर्वाद घेऊन कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी जावे, असा अजब दावा तीरथ सिंह रावत यांनी केला आहे. तसेच कुंभमेळ्याची तुलना मरकजशी करू नये. असे करणे चुकीचे असल्याचा सल्लाही रावत यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.