नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच देशभरात नवा वाहन कायदा लागू झाला. काही राज्यांनी त्या कायद्याची अंमलबजावणी केली तर काही राज्यांकडून अद्यापही या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. दरम्यान, या कायद्यावर काही दिवसांपासून काही अफवांना पेव फुटले आहे. लुंगी, चप्पल घालून किंवा स्लिव्हलेस शर्ट घालून गाडी चालवल्याने दंड आकारण्यात आल्याची मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत होते. अशातच केंद्रीय वाहतूक आणि दळणवळ मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारे दंड आकारला जातो ही केवळ अफवा आहे, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन गडकरी यांनी केले आहे.
अफवाहों से सावधान…!#TrafficFines #MotorVehicleAct pic.twitter.com/vd2gLu72i3
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) September 25, 2019
नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी अफवांपासून सावध राहण्याची विनंती केली आहे. तसेच नव्या वाहन कायद्यामध्ये लुंगी, बनियान परिधान करून किंवा चप्पल घालून वाहन चालवल्यास दंडाची कोणतीही तरतूद नाही. तसेच वाहनाच्या मळलेल्या काचा किंवा वाहनात अतिरिक्त बल्ब नसल्यासही कोणताही दंड आकारण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नव्या वाहन कायद्यामध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या रकमेचे दंड भरलेल्या अनेक घटना समोर आल्या होत्या.