राग नकोच!

लहानपणापासून शिकत आलो आहोत की शत्रूवरही दिलखुलास प्रेम करावे! पण एक शत्रू मी असा जाणते ज्यावर आपण कधीही प्रेम करू नये, असे मला वाटते, तो म्हणजे राग! तुम्हा आम्हा सर्वांनाच येतो हा राग जो भल्या भल्या लोकांना ही बाहुपाशात जखडवतो.

शत्रू असला तरी आपल्यातच असतो तो पण आपण त्याला डोके वर काढण्याची संधी न दिलेलीच बरी. रागावतो म्हणजे प्रत्यक्षात काय करतो हो आपण? मोठ्याने किंचाळतो, आरडा ओरड करतो, वस्तूंची आदळआपट करतो, वेळी बोलत नाही, स्वतः खाणं पिणं सोडतो वगैरे वगैरे.. थोडक्‍यात स्वतःचे नुकसानच नाही का करत?

मानवी भावनाच शेवटी ती.. मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींचा माणसाला राग येणं साहजिक आहे पण जेव्हा राग अनावर होतो तेव्हा नको त्या समस्या निर्माण होतात. खासकरून युवावस्थेतला राग म्हणजे समस्यांना स्वतःहून दिलेले आमंत्रण!

रागीट असू तर समाजात वावरणे कठीण होऊन बसते व वेळी इतरांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेण्यासही पुढे मागे बघत नाही आपण. आपली सारासार विचारबुद्धी हा राग संपुष्टात आणतो आणि त्यामुळे कालांतराने आपली निर्णय क्षमता संपुष्टात येते.

क्रोध प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी घातक आहेच परंतु, युवावस्थेत ही प्रवृत्ती जास्त धोकादायक ठरू शकते कारण या अवस्थेत ही प्रवृत्ती आपल्या कार्यक्षमतेवर, निर्णयक्षमतेवर विपरीत परिणाम घडवते. अर्थातच त्याचा परिणाम करीयवरवरही होतो.

रोग झाला की त्याला औषध असतेच परंतु रोग होऊ नये अशाही काही गोष्टी आपण आपल्या जीवनात पाळतो. त्याचप्रमाणे राग येऊ नये आणि आला तर त्याने आपल्याला धाकात ठेवण्या आधी त्याला धाकात ठेवणे हे आपण सहज करू शकतो असे मला वाटते.

यासाठीचा सोपा सिद्धांत देऊ का? ‘Listen, Understand, Accept and Respond if required’. समोरचा व्यक्ती काय म्हणतोय ऐकून घ्या, समजून घ्या, स्वीकार आणि गरज पडली तरच उत्तर द्या. शेवटी अनावश्‍यक बाबींना उत्तर न देणे हे ही एक प्रकारचे उत्तरच नाही का!

-सिद्धी संजय सोमाणी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)