मुंबई – महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला करोनाची लागण झाली आहे. या मंत्र्यांची काल रात्री उशिरा करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान, यापूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनादेखील करोना झाला होता.
राज्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते हे मुंबईहून आपल्या मतदारसंघात परतले होते. यानंतर त्यांनी स्वत:हून करोना चाचणी केली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना करोना झाल्याचे स्पष्ट झाले. ते लॉकडाऊनच्या काळात दोन महिने मुंबईबाहेरच होते. मात्र, मध्यंतरी विधानपरिषद निवडणुकीसाठी ते मुंबईला गेले होते.
या निवडणुकीनंतर ते पुन्हा गावी परतले व स्वत: होम क्वारंटाईन झाले होते. त्यांनी कुटुंबापासून स्वत:ला वेगळे ठेवले होते. रुग्णालयात त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या रिपोर्टनंतर त्यांनी तेथेच उपचार घेतले. त्यानंतर आज ते उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले.
मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर आहे. मुंबईकडे रवाना होताना त्यांनी उपस्थितांना हात दाखवून आपण ठीक असल्याचे सांगितले.