नवी दिल्ली : देशातील करोना रुग्णांची संख्या जरी कमी झाली असली तरी करोनाचे संकट अजूनही कायम आहे. यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यासाठी वारंवार सूचना करण्यात येत आहेत. या सर्वात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी मास्क घेण्यास नकार देताना दिसत आहेत.
आम आदमी पक्षाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत आपने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्रोल केले आहे. व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी एका कार्यक्रमात दिसत असून यावेळी तिथे स्टॉल लावलेली व्यक्ती त्यांना मास्क घेण्याचा आग्रह करताना दिसत आहे. समोरील व्यक्ती गुजराती भाषेत बोलताना ऐकू येत आहे. वारंवार आग्रह करुनही मोदी मात्र मास्क घेण्यास नकार देताना व्हिडीओत दिसत आहे.
Wear a mask. Don't be like Modi ji. pic.twitter.com/lPxdTEdZiI
— AAP (@AamAadmiParty) December 17, 2020
आम आदमी पक्षाने व्हिडीओ शेअर करताना, ‘मोदींसारखं वागू नका, मास्क घाला’ अशी उपहासात्मक टीका केली आहे.
व्हिडीओत नरेंद्र मोदींच्या मागे असणारे अधिकारी आणि सुरक्षारक्षक यांनी मास्क घातलेलं दिसत आहे. दरम्यान हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे याचा उल्लेख आम आदमी पक्षाने व्हिडीओत केलेला नाही.