करोना मृतांसाठी ‘दानशूरांचाच खांदा’!

मृतदेह गुंडाळण्यासाठी ससूनमध्ये प्लॅस्टिक कव्हर केले उपलब्ध

पुणे – करोना मृतांसाठी दानशूरांनी “कव्हर’च्या स्वरूपात खांदा दिला आहे. पीपीई किटसोबतच मृतांना “पॅक’ करण्यासाठी कव्हरही अनेकांनी देणगीदाखल दिले आहेत.

करोना बाधितांवर उपचार करणाऱ्या परिचारिका आणि डॉक्‍टर तसेच रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट अनेक संस्था, व्यक्ती यांनी देणगीदाखल दिले आहेत. मात्र, करोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्या पार्थिवाची विल्हेवाट नियमानुसारच झाली पाहिजे, अन्यथा अन्य लोकांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे बाधिताचे पार्थिव प्लॅस्टिक कव्हरमध्ये रॅप करून त्याची विल्हेवाट लावणे महत्त्वाचे आहे. त्यानुसार त्यासाठी कव्हर उपलब्ध असणेही आवश्‍यक आहे. त्यानुसार ससून सर्वोपचार रुग्णालयात खासगी संस्था, संघटना आणि वैयक्तिक देणगीदारांनी हे कव्हर उपलब्ध करून दिल्याचे ससून प्रशासनाकडून सांगण्यात आले.

इंग्लंड, अमेरिका, इटली किंवा चीन या देशांमध्ये मृतांचा आकडा वाढत चालला होता आणि त्यांना दफन करण्याला जागाच नव्हती, तसेच शवागारही भरले होते. म्हणून त्यांनी काही बॉडीज वातानुकूलित कंटेनर्समध्ये भरून ठेवल्या होत्या. मात्र, सुदैवाने भारतात काही धर्मांमध्ये दहन करण्याची प्रथा असल्याने जागेची उपलब्धता हा विषय नाही. परंतु हे मृतदेह पॅक करण्यासाठी कव्हरचा तुटवडा भासू शकतो.
शहरात करोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या आता पावणेतीनशे पार गेली आहे. हे लक्षात घेता ससूनकडे साठा उपलब्ध असल्याचे रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.