इस्लामाबाद – पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या विस्कळीत स्वरूपात असली तरी गाढवांनी मात्र या अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात तारले आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये पाकिस्तानमधील गाढवांची संख्या वाढली असून चीनला पाकमधून गाढवे निर्यात करण्याचे प्रमाणही वाढले आहे.
पाकिस्तानने आपले आर्थिक सर्वेक्षण जाहीर केले असून, गाढवांच्या संख्येमध्ये पाकिस्तान आता जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश झाला आहे. 2020 मध्ये पाकिस्तानमध्ये 55 लाख गाढवे होती. 2021 मध्ये ही संख्या 56 लाखांवर गेली तर 2022 मध्ये ही संख्या 57 लाख झाली. बहुतांश गाढवे चीनमध्ये निर्यात केली जातात.
चीनमध्ये रस्त्यावर जे तयार अन्न मिळते त्यामध्ये गाढवाचे मांस सर्वात लोकप्रिय आहे. त्यासाठी चीन पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात गाढवे आयात करतो. पाकिस्तानमधील म्हशींची संख्याही वाढली आहे. गेल्यावर्षी चार कोटी 37 लाख म्हशी होत्या. आता हा आकडा चार कोटी 50 लाखांवर पोहोचला आहे.
पाकिस्तानात घोडे आणि उंट यांच्या संख्येमध्ये मात्र गेल्या चार वर्षांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही; पण गेल्या चार वर्षांच्या कालावधीमध्ये शेळ्या आणि मेंढ्यांच्या संख्येत मात्र चांगली वाढ झाली आहे. पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याचे काम हे पशुधन सध्या करत आहे.