पुणे – पुणे महापालिका व स्वच्छ संस्थेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या “व्ही कलेक्ट ऑन व्हील्स’ या उपक्रमाला सोमवारपासून (दि.9) सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी पुणेकरांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोथरूड, मॉडेल कॉलनी, भोसलेनगर व अशोकनगर परिसरातील सुमारे नागरिकांनी कपडे, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खेळणी, पुस्तके, आदी लोकोपयोगी वस्तू दान केल्याचे स्वच्छ संस्थेकडून सांगण्यात आले.
या उपक्रमाकरीता वापरण्यात आलेले तिनही टेम्पो खचाखच भरले. विशेषतः ज्येष्ठ नागरिक या उपक्रमास चांगला प्रतिसाद देत आहेत. प्रत्येकी तीन महिन्यांनी व्ही कलेक्ट उपक्रम राबविण्यात येणार आहे. पुढील उपक्रम जानेवारी महिन्यात हाती घेण्यात येईल. दरम्यान, सकाळी 10 ते दुपारी 3.45 वाजेदरम्यानची वेळ अपुरी ठरत असून वेळ आणखी दीड तासाने वाढवावा, अशी मागणी काही ज्येष्ठांनी केली आहे.
पुणे महापालिकेच्या ई-कचरा संकलन केंद्रालाही नागरिक चांगला प्रतिसाद देत आहेत. स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण मिशन अंतर्गत मयूर कॉलनी-डहाणूकर कॉलनी परिसरात कोथरूड, बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने ई-कचरा संकलन मोहिम राबविण्यात आली. त्यासाठी 11 ठिकाणी केंद्रांची उभारणी करण्यात आली.
दरम्यान, या अभियानात मोठे आणि मध्यम आकाराचे एलईडी टीव्ही, 8 लॅपटॉप, प्रिंटर, वायर, जुने रेडिओ यासह 500 किलो प्लॅस्टिक, 300 किलो जुने कपडे, 180 किलो वजनाचे साऊंड, 300 किलो बॅटरी, चार्जर असा एकूण 2627 किलो कचरा संकलित करण्यात आला. यातील चांगले साहित्य गरजू लोकांना विनामूल्य देण्यात येणार आहे. तसेच, निरूपयोगी आणि टाकाऊ साहित्य पुनर्वापरासाठी केंद्रांकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.