कलंदर: दान व मतदान

उत्तम पिंगळे

परवा प्राध्यापक विसरभोळ्यांकडे गेलो होतो. मतदान आता जवळ आले आहे व प्राध्यापक मतदान या शब्दाविषयी बोलत होते. मतदान म्हणजे आपण आपल्या मताचे दान करतो असा सरळ सरळ अर्थ होतो व तसा तो बरोबरही आहे; पण प्राध्यापक मला दान या शब्दाकडे घेऊन गेले.

एखादी गोष्ट आपण मदत म्हणून कुणाला दिली की त्याला त्याचा खरोखर उपयोग होईल त्याला पण “दान’ म्हणू शकतो. या दानांमध्ये विविध प्रकार आहेत. कित्येकजण आपण पापमुक्‍त व्हावे म्हणूनही दान करत असतात. पण असेही काही जण आहेत की ज्यांना सतत दुसऱ्याला मदत करावीशी वाटत असते.अर्थात, प्राध्यापक पुढे म्हणाले, खरंतर प्रत्येक दान करणाऱ्याने दोन गोष्टींचा नक्‍कीच विचार करावा. पहिले म्हणजे ज्याला आपण दान करणार आहे त्याला खरोखर त्याची गरज आहे काय? उदाहरणार्थ, एखाद्याकडे एक वस्तू मुबलक असल्यास तीच वस्तू त्याला दान दिली तर त्याला काही उपयोग होणार नाही. दुसरे म्हणजे आपण ज्याला दान देणार आहोत ती व्यक्‍ती त्या दानास पात्र आहे की नाही हेही तपासणे आवश्‍यक आहे.

एखाद्यास पैसा मदत म्हणून दिला व त्याने सट्टा जुगारात घालवला तर काय उपयोग? म्हणूनच मदतीची गरज व पात्रता या दोन्ही गोष्टी दान देणाऱ्याने विचारात घ्याव्यात तसेच आपल्या दानाने घेणाऱ्या व्यक्‍तीस मदत व उभारी मिळेल व तो आळशीही बनणार नाही हेही पाहणे योग्य ठरते. एखाद्याला छोटा व्यवसाय सुरू करायला कर्ज दिले व नंतर त्याचे रूपांतर मोठ्या व्यवसायात झाले तर ते खरे सत्पात्री दान. तसे आणि खरेतर दान देणाऱ्याने कोणतीही अपेक्षा ठेवू नये. असे म्हणतात की उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हातालाही कळू नये.

आता आपण मतदानाकडे वळू.लोकशाही पद्धतीमध्ये आपण आपल्या मताने आपले प्रतिनिधी निवडून देत असतो. या पद्धतीमध्ये मतदान, उमेदवार व मतदाता तीनही महत्त्वाचे असतात. आता आपण मतदान का करावे? कारण कुणाला निवडून देणे हे त्यावेळी तरी आपल्याच हातात असते. आता दानासारखा विचार केल्यास मत मागतात का? तर हो कारण सर्वच उमेदवार तसा प्रचार करत असतात. आता दुसरे म्हणजे मत ज्याला देणार तो त्याचा योग्य उपयोग करणार की नाही? हेच तर मतदाराने डोळस बनून ठरवायचे आहे.

पूर्वी ऐंशी टक्‍के समाजकारण व वीस टक्‍के राजकारण असे. आता नेमके उलटे झालेले आहे कित्येक वेळेला लोकाभिमुख कार्यातही राजकारण केले जाते. अशा वेळी मतदाराने जागरूक राहणे आवश्‍यक आहे. आपल्या विभागाचा विकास कोण करू शकेल त्यालाच मत देणे आवश्‍यक आहे. तसेच कुणीही योग्य वाटत नसल्यास “नोटा’ बटनही दाबू शकतो ज्यामुळे किती जणांना कोणीही नको ते तरी समजू शकते.ज्याप्रमाणे या हाताचे दान त्या हाताला समजू नये त्याप्रमाणे आपण दिलेले मत आपल्यापाशीच ठेवणे योग्य ठरते. उगाच आपण कोणाच्या बाजूचे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करू नये जेणेकरून गुप्त मतदान हे खरोखरच गुप्त व सत्पात्री मतदान होईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)