राहुरी -दरोडेखोरांनी आता आपला मोर्चा मंदिरातील दान पेट्यांकडे वळविण्याचे दिसून येत आहे. काल मध्यरात्री दरम्यान राहुरी शहरातील भर पेटत असलेल्या जैन स्थानक मंदिरात चार ते पाच भामट्यांनी दानपेट्या फोडून सुमारे पाच ते सहा तोळे सोन्याचे दागिने तसेच अडीच ते तीन लाख रुपये रोख रक्कम, असा एकूण पाच ते सहा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
राहुरी शहरात भरपेठेत शिवाजी चौक परिसरात पोस्ट ऑफिससमोर श्री सुपार्श्वनाथ श्वेतांबर जैन मंदिर आहे. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास चार दरोडेखोरांनी मंदिराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यांनी मंदिरातील दोन दानपेट्या फोडून त्यामधील सुमारे पाच ते सहा तोळे सोन्याचे दागिने व सुमारे दोन लाख रुपये रक्कम, असा एकूण पाच ते सहा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
मंदिरातील पुजारी सकाळी सहा वाजे दरम्यान मंदिरात आले, तेव्हा चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. यावेळी पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, उप निरीक्षक चारूदत्त खोंडे, सज्जन नाऱ्हेडा, पोलिस शिपाई शिवाजी खरात, नदीम शेख, आदिनाथ चेमटे, गणेश सानप, इफ्तीखार शेख, महिंद्रा गुंजाळ तसेच श्वान पथकातील हवालदार उमेश गोसावी, राजू वैराळ हे रक्षा नामक श्वानला घेऊन घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी रक्षा नामक श्वानाने जैन स्थानक मंदिरापासून जुनी भीलहाटीमधून प्रगती शाळेच्या गेटपर्यंत माग दाखवीला. त्या ठिकाणी ते घुटमळले. यावेळी पोलीस पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा तपास सुरू असताना आज दुपारी बारा वाजे दरम्यान या घटनेतील संशयीत आरोपी सखाराम भगवान माळी याला खुरपे मळा येथील नदीकाठावर पाठलाग करून ताब्यात घेतले. आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या एका महिलेला संशयीत म्हणून ताब्यात घेतले. पोलीस पथकाकडून आरोपींचा शोध सुरू होता.