बेल्हे- करोना विषाणूंमुळे सर्व हॉस्पिटल आणि सरकारी रुग्णालयात रक्तपुरवठा कमी पडत असल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहनाला साथ देत आळेफाटा (ता. जुन्नर) येथे शनिवारी (दि.28) रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी आळेफाटा येथील आळे गणमधील पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आळेफाटा पोलीस स्टेशनच्या सहकार्याने रक्तदान शिबिरास प्रतिसाद मिळाला.
यावेळी आमदार अतुल बेनके यांनी भेट दिली. तसेच त्यांनी स्वतः रक्तदान केले. यावेळी पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, रोटरी क्लब, लायन्स क्लब तसेच विविध सामाजिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला.