वॉशिंग्टन – दिनांक १ फेब्रुवारीपासून चिनी आयातीवर १० टक्के कर लादण्याचा विचार करत असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडामध्ये चीन पाठवत असलेल्या घातक ड्रग्ज फेंटॅनिलचा प्रवाह रोखण्यासाठी ही उपाययोजना केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
फेंटानिल हे एक अत्यंत व्यसनकारक कृत्रिम ओपिओइड आहे. ते यूएस ड्रग एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशननुसार, देशातील सर्वात घातक ड्रग्ज आहे. जागतिक फेंटॅनिल पुरवठा साखळी बहुतेकदा चीनमधील रासायनिक कंपन्यांपासून सुरू होते, असेही डीइएने म्हटले आहे.
“आम्ही चीनवर १० टक्के कर लावण्याबद्दल विचार करत आहोत. कारण चीनद्वारे मेक्सिको आणि कॅनडाला फेंटानिल पाठवले जाते आहे, असे ट्रम्प यांनी शनिवारी व्हाईट हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. दिनांक १ फेब्रुवारीपासून हा कर लादला जाईल, असेही ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात ३०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या चिनी आयातीवर आयात शुल्क लावले होते. त्या व्यतिरिक्त हे शुल्क लागू होईल. माजी अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी हे नियम कायम ठेवले होते, त्यांनी चिनी इलेक्ट्रिक वाहने, सौर सेल, सेमीकंडक्टर आणि प्रगत बॅटरीवर अतिरिक्त शुल्क लादले होते.
आता मेक्सिको आणि कॅनडावरही २५ टक्के आयात शुल्क लावले जाणार असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात शी जिनपिंगयांच्याशी फोनवरून झालेल्या चर्चेच्यावेळी आयात शुल्काबाबत फारसे बोलणे झाले नव्हते, असेही त्यांनी सांगितले.