वॉशिंग्टन – अमेरिकेत 6 जानेवारी रोजी ट्रम्प यांच्या चिथावणीमुळे राजधान वॉशिंग्टन येथे जो हिंसक प्रकार घडला त्या संबंधात त्यांच्या विरोधात तेथे जी इम्पिचमेंट ट्रायल सुरू आहे त्यात ट्रम्प यांनी साक्ष देऊन आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी सूचना त्यांना करण्यात आली आहे.
इम्पिचमेंट मॅनेजर जेमी रस्कीन यांनी ट्रम्प यांना ही सुचना केली आहे. ट्रम्प यांनी शपथेवर आपली ही भूमिका स्पष्ट करावी अशी सुचना त्यांनी ट्रम्प यांना केली आहे. त्यांच्या विरोधातील महाभियोगाचा खटला सिनेट समोर चालणार आहे, त्या खटल्याच्या सुनावणीच्यावेळी सिनेट समोर येऊन त्यांनी ही साक्ष द्यावी असे त्यांना सांगण्यात आले आहे. पण ही सूचना ट्रम्प यांनी धुडकाऊन लावली असून हा एक पीआर स्टंट आहे असे त्यांनी म्हटले आहे.
महाभियोग समितीने ट्रम्प यांच्यावर जे आरोप केले आहेत त्याला ट्रम्प यांनी या आधीच उत्तरे दिली आहेत. त्यात त्यांनी सर्व आरोप धुडकाऊन लावताना म्हटले आहे की, अशा घटनांच्या संबंधात अमेरिकेच्या अध्यक्षांकडून ज्या प्रकारची भूमिका निभावली जाणे आवश्यक आहे ती भूमिका आम्ही निभावली आहे. तरीही आमच्या विरोधात जी कारवाई सुरू केली आहे, ती घटनाबाह्य आहे अशी भूमिकाही ट्रम्प यांनी आपल्या वकिलांमार्फत मांडली आहे.