न्यूयॉर्क – अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास टेस्ला आणि ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी व्यक्त केला आहे. ट्रम्प यांच्यावर मॅनहटनमध्ये बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. मात्र जर ट्रम्प यांना या आरोपांमध्ये गोवण्यात आले, तर 2024 मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये ट्रम्प मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास मस्क यांनी केलेल्या ट्विटमधून व्यक्त केला आहे.
एका वृत्तवाहिनीने ट्रम्प यांच्या संभाव्य अटकेबाबत घेतलेल्या ऑनलाईन प्रश्नावलीला उत्तर देताना मस्क यांनी हे मत व्यक्त केले आहे. कालच ट्रम्प यांनी आपल्याला मंगळवारी अटक केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली होती. या संभाव्य अटकेच्या विरोधात समर्थकांनी आंदोलन करावे आणि आपल्या देशाला वाचवावे, असे आवाहन देखील ट्रम्प यांनी केले होते.
“जर आपण नुसते शांतपणे बघत बसलो, तर ते (बायडेन प्रशासन) आपल्या देशाला ठार मारतील. आपण आपल्या अमेरिकेला वाचवलेच पाहिजे. म्हणून आंदोलन करा, आंदोलन करा, आंदोलन करा.’ असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून म्हटले होते.
जर ट्रम्प यांना अटक झाली, तर गुन्हेगारी आरोप असलेले ते पहिले माजी अध्यक्ष ठरतील. मात्र आतापर्यंत तशी कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नाही, असे ट्रम्प यांच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.