जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या महासत्ता अमेरिकेचे 47 वे अध्यक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा विराजमान होणार आहेत. मोठा गाजावाजा झालेल्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये विजयी होण्यासाठी गरजेचा असलेल्या 270 मतांचा आकडा डोनाल्ड ट्रम्प यांनी ओलांडला असल्याने आता ते दुसर्यांदा या महासत्तेच्या प्रमुख पदावर बसणार आहेत.
डेमोक्रॅटिक पक्षाकडून सत्ता खेचून आणताना डोनाल्ड ट्रम्प यांनी विद्यमान उपाध्यक्ष आणि अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला. भारतीय वंशाच्या असलेल्या कमला हॅरिस यांच्या पराभवामुळे अनेकांना दुःख झाले असले, तरी ट्रम्प यांच्या दुसर्या कारकिर्दीमध्ये भारतासाठी काही चांगले घडणार आहे, असे संकेतही मिळू शकतात. निवडणूक प्रचाराच्या कालावधीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे जवळचे मित्र आहेत आणि भारत हा आमचा सर्वात महत्त्वाचा भागीदार आहे असे अनेक वेळा सांगितले होते. अमेरिकेत असलेल्या 30 लाखांपेक्षा जास्त भारतीयांची मते मिळवण्यासाठी त्यांनी हे विधान केले, हेही तेवढेच खरे. गेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त केली होती आणि अमेरिकेच्या लोकशाही इतिहासात पहिल्यांदाच ज्या प्रकारे हिंसक आंदोलन झाले होते हे पाहता खरे तर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिमा बर्यापैकी मलीन झाली होती.
ट्रम्प सर्वात प्रथम जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हासुद्धा त्यांची चार वर्षांची कारकीर्द अशीच वादग्रस्त होती. कोणत्याही निर्णयामध्ये त्यांनी गांभीर्य दाखवले असे दिसत नव्हते. जगातील सर्वात मोठ्या सत्तेचे प्रतिनिधित्व करतानाही अनेक वेळा डोनाल्ड ट्रम्प यांचा कॅज्युअल अप्रोच असायचा तरीही अमेरिकेतील जनतेने पुन्हा एकदा डेमोक्रॅटिक पक्षाला नाकारून रिपब्लिकन पक्षाला सत्ता दिली आहे. कारण गेल्या चार वर्षातील डेमोक्रॅटिक पक्षाच्या सरकारनेसुद्धा काही वेगळे केले असे नाही. बायडेन यांच्यासारखे जास्त वयाचे अध्यक्ष अमेरिकेच्या जनतेला मानवले नाहीत. चार वर्षांच्या कालावधीत सरकारने काहीच वेगळे केले नाही. या निवडणुकीमध्ये ऐनवेळी बायडेन यांच्याऐवजी कमला हॅरिस यांना उमेदवारी देण्याची नामुष्कीसुद्धा या पक्षावर आली. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम होऊनच पुन्हा एकदा अमेरिकेतील जनतेने डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे सत्ता दिली आहे.
ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या चार वर्षांच्या कारकिर्दीमध्ये ज्या प्रकारे ‘अमेरिका फर्स्ट’ हे धोरण राबवले होते त्याच धोरणाच्या पुढच्या भागाला आता सुरुवात होणार आहे, हे उघड आहे. या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ हा नवीन नारा दिला होता. साहजिकच इतर कोणत्याही देशांचा विचार न करता अमेरिकेचे हित समोर ठेवूनच निर्णय घेण्यावर नवे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा भर असणार आहे, हे उघड आहे. अमेरिकेतील निर्वासितांचा प्रश्न असो किंवा नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत येणार्या इतर देशातील नागरिकांचा विषय असो याबाबत काही कठोर निर्णय येत्या काही कालावधीमध्ये घेतले जाण्याची शक्यता आहे. ‘अमेरिका फर्स्ट’ या धोरणाप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत स्पष्टपणे सर्वात प्रथम प्राधान्य हे अमेरिकेतील नागरिकांना, अमेरिकेतील उद्योगांना आणि अमेरिकेच्या हिताला दिले जाईल, असे सांगितले होते.
जगाच्या कानाकोपर्यातून नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत येणार्यांमुळे जर अमेरिकेतील नागरिकांना त्रास होत असेल तर याबाबतच्या धोरणाचा पुनर्विचार केला जाईल, असेही ट्रम्प यांनी अनेक वेळा सांगितले होते. साहजिकच परकीय नागरिकांनी अमेरिकेत नोकरीसाठी वास्तव्य करण्यासाठी जे नियम आहेत ते येत्या काही कालावधीमध्ये अधिक कठोर होण्याची शक्यता आहे. भारतातील अनेक युवक नोकरीच्या निमित्ताने किंवा इतर काही कारणाने अमेरिकेत सेटल झाले आहेत किंवा सेटल होण्याच्या प्रतिक्षेत आहेत त्या सर्वांना आता अमेरिकेच्या या नवीन धोरणाचा विचार करावा लागणार आहे. ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचाराच्या कालावधीमध्ये अत्यंत स्पष्टपणे रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती.
इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षामध्ये सुद्धा इस्रायलच्या पाठीशी राहण्याची घोषणा केली होती. साहजिकच डोनाल्ड ट्रम्प यांचे परराष्ट्र धोरण कसे असेल त्याचे संकेतही तेव्हा त्यांनी दिले होते. ट्रम्प हे स्वतः मोठे उद्योगपती असल्याने कोणताही निर्णय कॉर्पोरेट पद्धतीने घेण्याची त्यांना सवय आहे. त्यामुळे अनेकदा कोणताही मागचा पुढचा विचार न करता एखादे विधान करणे किंवा एखादा निर्णय घेणे अशा अनेक गोष्टी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात घडल्या होत्या. गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरसुद्धा त्यांनी अशाच प्रकारच्या प्रतिक्रियांचे दर्शन घडवले होते. खरे तर सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेतील न्यायालयामध्ये अनेक खटले दाखल आहेत. पण आता पुन्हा एकदा ट्रम्प यांच्या हातात सत्ता आल्यानंतर हे खटले विस्मृतीत जाणार आहेत हे उघड आहे.
‘अमेरिका फर्स्ट’ आणि ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणांना अमेरिकेतील जनतेने प्रतिसाद दिला हेच यावरून सिद्ध होते. अर्थात, अध्यक्षपदाची अधिकृत सूत्रे स्वीकारल्यानंतर अमेरिकेचे अधिकृत धोरण म्हणून डोनाल्ड ट्रम्प नक्की कोणते निर्णय घेतात हे पाहणेसुद्धा भारतासारख्या अनेक देशांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या तरी अमेरिकेसारख्या जगातील सर्वात मोठ्या देशात लोकशाही निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांनी सत्तांतराचा कौल दिला आहे, हे वास्तवच स्वीकारावे लागणार आहे.