Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि चीनमधील वाढत्या जवळीकीवर अत्यंत तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. जर कॅनडाने चीनच्या मालासाठी अमेरिकेची ‘मागचे दार’ (ड्रॉप-ऑफ पोर्ट) म्हणून वापर करण्याचा प्रयत्न केला, तर कॅनडातून अमेरिकेत येणाऱ्या सर्व उत्पादनांवर १०० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लादले जाईल, अशी कडक चेतावणी ट्रम्प यांनी दिली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यावर निशाणा साधला. विशेष म्हणजे, कार्नी यांचा उल्लेख त्यांनी मुद्दाम ‘गव्हर्नर कार्नी’ असा केला. ट्रम्प यांनी लिहिले की, “जर गव्हर्नर कार्नी यांना असे वाटत असेल की ते कॅनडाला चीनसाठी एक ‘ड्रॉप-ऑफ पोर्ट’ बनवतील, जिथून माल अमेरिकेत पाठवला जाईल, तर ते पूर्णपणे चुकीचे आहेत.” “चीन कॅनडाला गिळंकृत करेल” ट्रम्प यांनी केवळ आर्थिक इशाराच दिला नाही, तर कॅनडाच्या भविष्याबद्दलही भीती व्यक्त केली. त्यांच्या मते, चीनसोबतचा कोणताही करार कॅनडासाठी आत्मघातकी ठरेल. “चीन कॅनडाला पूर्णपणे निगलून टाकेल. तेथील व्यवसाय, सामाजिक रचना आणि जीवनशैली उद्ध्वस्त होईल,” असे भाकीतही ट्रम्प यांनी वर्तवले आहे. वाद नेमका कशामुळे? १७ जानेवारी रोजी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी चीनसोबत एका नवीन व्यापारी कराराची घोषणा केली होती. या करारामुळे कॅनडाला ७ अब्ज डॉलरपेक्षा जास्त निर्यातीच्या संधी मिळतील, असा दावा कार्नी यांनी केला होता. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (WEF) बोलताना कार्नी यांनी ट्रम्प यांच्या दबावाकडे अप्रत्यक्ष इशारा करत म्हटले होते की, “कॅनडा अमेरिकेमुळे जिवंत नाही, तर आम्ही कनाडाई आहोत म्हणून आमचा देश प्रगती करत आहे.” संघर्षाची पार्श्वभूमी – ट्रम्प आणि कार्नी यांच्यातील हा वाद नवा नाही. याआधी ग्रीनलँडमधील ‘गोल्डन डोम’ क्षेपणास्त्र संरक्षण प्रकल्पावरूनही दोघांमध्ये खटके उडाले होते. मात्र, आता चीनच्या मुद्द्यावरून अमेरिकेने घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे उत्तर अमेरिकेतील राजकारण आणि जागतिक व्यापारावर याचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. हेही वाचा – Silver Prices: चांदी महागणार? आगामी अर्थसंकल्पात आयात शुल्क 15 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता