वॉशिंग्टन – अमेरिकेच्या कॅपिटॉल हिल्स येथे सहा जानेवारी रोजी झालेल्या हिंसेनंतर फेसबुकसहीतच सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सने प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बंदी घातली. मात्र, त्यानंतरही त्यांनी चक्क सुनेच्या फेसबुक पेजवरुन आपल्या फॉलोअर्सशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
सून लारा ट्रम्पच्या फेसबुक पेजवर ट्रम्प यांनी व्हिडीओ पोस्ट केला होता. मात्र फेसबुकने हा व्हिडीओ काढून टाकला आहे. फेसबुकने व्हिडीओ हटवण्याबरोबरच यासंदर्भात इशाराही दिला आहे. लारा ट्रम्प यांच्या पेजवरुन डोनाल्ड ट्रम्प यांना साक्षात्कार झाल्याचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. मात्र काही वेळातच फेसबुकने हा व्हिडीओ काढून टाकल्याचा मेल लारा यांना केला. या व्हिडीओत ट्रम्प यांचा आवाज असल्याने व्हिडीओ काढून टाकत आहोत, असे कंपनीने लारा यांना कळवल्याचे रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. ट्रम्प यांच्या सुनेनेच त्यांची मुलाखत घेतली होती.