वॉशिंग्टन – अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा पत्रकारांवर भडकल्याचे वृत्त येत आहे. अमेरिकेत दररोज होणाऱ्या हजारो मृत्यूसंबंधित प्रश्न विचारला असता डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनलाच जाऊन विचारा, असे उत्तर देत पत्रकार परिषद अर्धवट सोडून गेले.
व्हाईट हाऊसमध्ये दररोज प्रत्रकार परिषद घेण्यात येते. यावेळी एका मूळ आशियाई असणाऱ्या पत्रकार जियांग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना एक प्रश्न विचारला कि, अमेरिकेत आतापर्यंत ८० हजारांहून अधिक मृत्यू झाले असले तरीही तुम्ही करोनाविरोधात लस संशोधनाच्या सहकार्यास जागतिक स्पर्धेच्या दृष्टीने का पाहत आहात? या प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प भडकले आणि म्हणाले कि, मला विचारू नका, चीनला जाऊन विचारा व प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पत्रकार जियांगने पुन्हा ट्रम्प यांना मी आशियाई असल्याने तुम्ही असे बोलत आहात का? असा प्रश्न विचारला. यावर ट्रम्प म्हणाले कि, मी हे कोणालाही उद्देशून बोलत नाही. हे उत्तर त्या सर्वांसाठी जे मला वाईट प्रश्न विचारतात. जियांगने हा वाईट प्रश्न आहे का? असा प्रतिप्रश्न विचारताच डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्याही प्रश्नाला उत्तर न देता तेथून निघून गेले.
दरम्यान, परिणामकारक लसीशिवाय करोना विषाणू नष्ट होऊन जाईल असे चमत्कारिक वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. तसेच अमेरिकेत येत्या काळात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या ९५ हजार किंवा त्यापेक्षाही पुढे जाईल, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.