लंडन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तीन दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आज दाखल झाले. बकिंगहॅम राजवाड्यामध्ये त्यांनी ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचीही भेट घेतली. “ब्रेक्झिट’च्या मुद्दयावरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभुमीवर द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर या दौऱ्यात भर दिला जाणार आहे.
महाराणी एलिझाबेथ यांनी ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलनिया ट्रम्प यांचे बकिंगहॅम राजवाड्यात पारंपारिक पद्धतीने स्वागत केले. ट्रम्प यांनी युवराज चार्ल्स यांचीही भेट घेतली. राजघराण्याच्य विशेष सुरक्षा दलाकडून बंदुकीच्या 41 फैरी झाडून ट्रम्प यांना मानवंदना देण्यात आली.
राजघराण्यातील सदस्यांच्या भेटींबरोबरच ट्रम्प उद्या ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्याबरोबर चर्चा करतील. त्यामध्ये वातावरणातील बदल आणि चीनी कंपनी हुआवेई आदी विषयांवर चर्चा होणे अपेक्षित आहे.
मूळचे पाकिस्तानी वंशिय असलेले लंडनचे महपौर सादिक खान यांनी ट्रम्प यांच्या भेटीविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर ट्रम्प यांनी अतिशय हीन शब्दांमध्ये खान यांच्यावर टीका केली होती. खान यांनी लंडनमधील गुन्हेगारी कमी करण्याकडे लक्ष द्यावे. माझ्याकडे लक्ष देऊ नये. अमेरिकेच्या अध्यक्षांनी ब्रिटनच्या राजघराण्याला भेट देण्यावर भाष्य करणे हा ओंगळवाणा मूर्खपणा असल्याचे ट्रम्प म्हणाले होते.