गुन्हेगारी : जाळ्यात अडकला डॉन

प्रसाद पाटील

देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह सर्वत्र दहशत माजवलेल्या अंडरवर्ल्डच्या काळ्या साम्राज्याची आजच्या पिढीला फारशी माहिती नसेल. पण या अंडरवर्ल्डशी संबंधित दाऊद इब्राहीम, छोटा शकिल, छोटा राजन, अरुण गवळी यांसारख्या डॉननी सर्वसामान्यांसह व्यावसायिक, उद्योगपती आणि बॉलीवूड कलाकारांच्या मनात दहशत निर्माण केली होती. याच डॉन पंक्‍तीतील एक कुख्यात नाव म्हणजे रवी पुजारी. कर्नाटक आणि संपूर्ण महाराष्ट्रात 100 हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या आणि पोलिसांना गुंगारा देऊन पलायन केलेल्या या “डॉन’ला अलीकडेच सेनेगलमध्ये अटक करण्यात आली आहे. ही अटक पोलिस आणि शासन-प्रशासनाने मिळवलेले एक यश मानले जात आहे. 

1990-2000 च्या दशकात बॉलिवूडवर दबदबा निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांमध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम, छोटा राजन यांच्याबरोबरच रवी पुजारीचे नावही घेतले जाते. बॉलिवूडचे कलाकार आणि बिल्डर नेहमीच या गुंडांच्या रडारवर राहिले आहेत. दुबईत बसून बॉलिवूडच्या कलाकारांना धमकावण्यात रवी पुजारी सराईत होता. त्याने आतापर्यंत 15 हून अधिक कलाकारांना फोन करून धमकावले आहे. त्याने राकेश रोशन, महेश भट्ट यासारख्या बॉलीवूडमधील दिग्गजांना धमक्‍या दिल्या होत्या. रवी पुजारीविरुद्ध मुंबईत 55 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. कर्नाटक आणि संपूर्ण महाराष्ट्रातील गुन्हे पाहिल्यास दाखल गुन्ह्यांची संख्या शंभराहून अधिक असेल. साहजिकच, पोलिसांसाठी तो “मोस्ट वॉण्टेड’ होता. अनेक दिवस तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला होता; परंतु अलीकडेच सेनेगलची राजधानी डकार येथे त्याला अटक करण्यात आली. या कारवाईला मुंबई गुन्हे शाखेचे प्रमुख आशूतोष डुंबरे यांनी दुजोरा दिला आहे. गुजरातचे एटीएस आणि गुन्हे शखा व बंगळूर पोलिस हे अनेक काळापासून रवी पुजारीच्या मागावर होते. त्याला सेनेगलमध्ये एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. ही अटक पोलिस आणि शासन-प्रशासनाने मिळवलेले एक यश मानले जात आहे. रवी पुजारीच्या अटकेने अंडरवर्ल्डची अनेक गुपिते बाहेर येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. या अटकेच्या निमित्ताने कर्नाटक ते सेनेगल व्हाया मुंबई, दुबई, ऑस्ट्रेलिया असा प्रवास करणाऱ्या रवी पुजारीचा प्रवास जाणून घेणे औचित्याचे ठरणार आहे.

पुजारीच्या गुन्हेगारीचा इतिहास मोठा आहे. रवि पुजारी दहशत पसरवण्यासाठी “पॅंथर’चा वापर करत असे. शिवीगाळ आणि गोळीबाराच्या मदतीने लोकांना धमकावण्यात तो माहीर होता. तो मूळचा कर्नाटकचा. त्याचा जन्म उडपी जिल्ह्यात झाला. लहानपणीच तो मुंबईला आला. त्याला इंग्रजी, हिंदी आणि कन्नड भाषाही चांगल्या अवगत आहेत. लहानपणीच त्याला कुरापतीमुळे शाळेतून काढले होते. त्याच्यामुळेच संपूर्ण कुटुंबाला मलप्पे गाव सोडण्याची वेळ आली होती. 1980 च्या दशकात तो अंधेरीत चहाच्या दुकानात काम करायचा. तेथून तो विनोद मटकर आणि रोहित वर्मा यासारख्या गुंडांना चहा द्यायचा. वर्मांच्या गुंडाने बाला जालटेची हत्या केल्यानंतर रोहित वर्माबरोबर त्याची उठबस वाढली. वर्माने पुजारीला बॅंकॉकला नेले. तेथेच त्याने छोटा राजनशी भेट घडवून आणली. 1990 मध्ये तो दुबईला गेला. तेथे बसून भारतातील बिल्डर आणि हॉटेल मालकांना धमकी देत खंडणी वसूल करण्याचा व्यवसाय सुरू केला. याच काळात त्याच्या तीन गुंडांनी कुकरेजा बिल्डरच्या ऑफिसमध्ये जावून ओमप्रकाश कुकरेजाची हत्या केली होती. त्यानंतर 8 वर्षांनंतर नवी मुंबईचा बिल्डर सुरेश वाधवा याच्यावरही प्राणघातक हल्ला केला होता. ऑफिसमधून वेळीच निघाल्याने त्यांचा जीव वाचला.

कर्नाटकमध्ये “पॅंथर’ आणि रवि पुजारी यांच्यातील संबंध चांगलेच लक्षात घेण्यासारखे आहे. रवी पुजारी हा आपल्या टोळीच्या माध्यमातून अनेक व्यापाऱ्यांना व्हिजिटिंग कार्ड पाठवायचा. या कार्डवर सर्वात वर पॅंथरचा फोटो असायचा आणि कार्डखाली रवी पुजारीचे नाव असायचे. कार्ड पांठवल्यानंतर तो व्यापाऱ्याला फोन करायचा आणि पैशाची मागणी करायचा. फोन केल्यानंतर सर्वात अगोदर “कार्ड पाहिले का?’ अशी विचारणा करायचा. त्याला दोन भाऊ, दोन बहिण आणि आई-वडिल होते. पुजारीचे वडिल आणि एका भावाचा मृत्यू झाला आहे. आता आई दोन मुलींसमवेत राहते. रवी पुजारीने प्रेमविवाह केला. त्याची बायको पद्माला बनावट पासपोर्टप्रकरणी अटक करण्यात आली होती. तीन महिन्यानंतर ती जेव्हा जामीनावर तुरंगाबाहेर आली तेव्हा तिनेही देशातून पळ काढला. रवी पुजारीला दोन मुली आणि एक मुलगा आहे.

बॉलिवूडवर दहशतीचे सावट                                                                                            बॉलिवूडच्या मंडळींवर रवी पुजारीची नेहमीच दहशत राहिली आहे. सलमान खान, अक्षयकुमार, करण जोहर आणि राकेश रोशन सारख्या कलाकारांना धमक्‍या दिल्या आहेत. काही दिवस शाहरुख खानलाही तो धमकीचे फोन करत होता. 2014 मध्ये “हॅप्पी न्यू इअर’च्या चित्रपटाचे परदेशातील हक्क देण्याबाबतची धमकी दिली होती तर अर्जित सिंगला पाच लाख रुपये किंवा दोन शो मोफत करण्याची धमकी दिली होती. त्याचबरोबर रवी पुजारीने शाहरुख खानला करीम मोरानीशी कोणत्याही प्रकारचे संबंध न ठेवण्याचा सल्ला दिला होता. करीम हा शाहरुखचा चांगला मित्र आणि व्यावसायिक भागिदारही आहे. करीम मोरानी आणि अली मोरानी यांच्या घराबाहेर त्याने गोळीबारही घडवून आणला होता.

तत्पूर्वी त्याने करिष्मा कपूरचा पती संजीव कपूरलादेखील धमकावून 50 कोटीची मागणी केली होती. यासंदर्भात त्याने एक मेलही पाठवला होता. मात्र पुजारीचा पंटर दुसरा इमेल पाठवण्यासाठी सायबर कॅफेत आला तेव्हा पोलिसांनी त्या पंटरला मुंबईत अटक केली. यानंतर पुजारीने मुंबईचे प्रसिद्ध वकिल माजिद मेमन यांना देखील मारण्याचा प्रयत्न केला. दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलशी संबंध ठेवल्याच्या कारणावरून हा प्रयत्न झाला. जे भारत विरोधी आहेत, पाकिस्तानशी गुप्तचर संघटना आयएसआय आणि दाऊद व शकीलशी निगडीत आहेत, त्यांना जीवंत ठेवणार नसल्याचे पुजारी म्हणायचा. या गोष्टीचा खुलासा त्याने स्वत: टिव्हीवर येऊन केला होता. 2015 मध्ये त्याने प्रसिद्ध वकिल हरिश साळवे यांनाही धमकी दिली होती. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांचे विशेष पथक करत आहे. आणंदच्या गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकालाही पुजारीने खंडणीसाठी धमकी दिली होती.

रवी पुजारीवर गुन्ह्यांची मालिका 
1993 मध्ये मुंबईत साखळी स्फोट झाले आणि रवी पुजारी हा दाऊदवर भयंकर चिडला. तो छोटा राजनचा खास व्यक्ती म्हणून ओळखला जायचा. मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची हत्या करण्याची जबाबदारी रवी पुजारीला देण्यात आली होती. 93 च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर छोटा राजन हा दाऊदपासून वेगळा झाला. इस्ट वेस्ट एअरलाईन्सचा मालक वाहिदची हत्या रवी पुजारीनेच केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्यानंतर त्याने कर्नाटकमध्ये मोहन कोटियनचा खून केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तपासाला वेग आला तेव्हा त्याने देशातून पोबारा केला. सप्टेंबर 2000 मध्ये बॅंकॉंकमध्ये गोळीबारानंतर छोटा राजनपासून अनेकांनी फारकत घेतली. त्यात पुजारीचा देखील समावेश होता. राजनच्या अटकेनंतर पुजारी “हिंदू डॉन’ होण्याच्या प्रयत्नात होता. या जोरावरच त्याने जेएनयूचा उमर खालिद, शेहला रशिद, जिग्नेश मेवाणी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पुजारीला अटक झाल्याने अंडरवर्ल्डमधील अनेक गोपनीय माहिती बाहेर येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

कारवाई करताना खबरदारी 
पुजारीला अटक करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी खूप काळजी घेतली. सेनेगलच्या तीन बसमधून पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोचले आणि चोहोबाजूंनी त्याला वेढा घालत त्याला पकडले. पुजारीने दक्षिण आफ्रिकेत व्यवसायात चांगलाच जम बसवला होता. त्याने हॉटेलची साखळी तयार केली होती. त्यात गयाना, बुर्किंना फासो, आयव्हरी कोस्ट या देशांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षात त्याने व्यावसायिक, राजकीय नेते, बॉलिवूड कलाकार यांच्यासह 75 हून अधिक जणांना खंडणीसाठी फोन केले आहेत. गुजरातमध्ये रवी आपल्या टार्गेटपेक्षा 50 कोटी अधिक वसूली करत होता. त्याला पकडण्यासाठी डकारमध्ये असलेल्या गुजराती नागरिकांची मदत घेतली. यापूर्वी तो अनेक वर्षे इंग्लंडमध्ये राहिला होता. त्याच्यासमवेत चोवीस तास हत्यारबंद सुरक्षा रक्षक तैनात असायचे.

आताच्या अटकेच्या कामी गुजरात एटीएस, महाराष्ट्र, बंगळूर पोलिसांनी त्याची ओळख पटवण्यासाठी सेनेगल पोलिसांना कागदपत्रे पाठवली. आता पुजारीला भारतात आणण्याची सर्वात मोठी अडचण म्हणजे तो श्रीलंकेच्या पासपोर्टवर प्रवास करत होता. ही बाब तपास यंत्रणेला डोकेदुखी ठरू शकते. अशीच काहीशी परिस्थिती थायलंडमध्ये उदभवली आहे. शकीलचा शार्पशुटर मुन्ना झिंगाडा याला अटक करण्यासाठी तपास यंत्रणा थायलंड सरकारशी चर्चा करत आहे. त्याला 2000 मध्ये बॅंकॉकच्या एका रुग्णालयात छोटा राजनवर गोळीबार करण्याच्या आरोपाखाली पाकिस्तानी पासपोर्टसह अटक करण्यात आली होती. रवी पुजारीला भारतात आणण्यासाठी सरकारला राजकीय मुत्सद्देगिरीही पणाला लावावी लागणार आहे. त्याच्या प्रत्यार्पणाबाबत नेमके काय घडते हे येणाऱ्या काही दिवसांत पहावे लागेल. तथापि, त्याच्या अटकेमुळे अंडरवर्ल्डचे कंबरडे मोडण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नाला एक मोठे यश मिळाले आहे हे मात्र नक्‍की !

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)