वकिलांकडे सल्ल्यांसाठी येत आहेत फोन
सतत सोबत राहण्यामुळे किरकोळ कारणांवरून पती-पत्नीमध्ये वाद
– विजयकुमार कुलकर्णी
पुणे – लॉकडाऊनमध्ये सुरू असलेले वर्क फ्रॉम होम… झालेली पगार कपात… सतत सोबत राहणे… या कारणांमुळे घरगुती हिंसाचाराचे प्रकार वाढले आहेत. अशा परिस्थितीत काय करावे, यासाठी सल्ला घेण्यासाठी वकिलांना फोन येत आहेत. परिस्थितीचे गांभीर्य पाहून वकिलांकडून सल्ला देण्यात येत आहे. मागील दोन महिन्यांत घरगुती हिंसाचाराच्या तब्बल 600 ते 700 तक्रारींची पुणे कंट्रोलकडे नोंद झाली आहे. काही प्रकरणांमध्ये “भरोसा’ सेलकडून टेलिफोनवरून समुपदेशन करण्यात येत आहे.
एका प्रकरणात आठ वर्षांपूर्वी दोघांचे लग्न झाले आहे. त्यांनंतर काही कालावधीनंतर झालेले त्यांच्यातील भांडण घटस्फोटासाठी न्यायालयापर्यंत गेले होते. दोन वर्षांपूर्वी तडजोडीअंती हे भांडण मिटले. तेव्हापासून ते दोघे एकत्र राहत होते. तो आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. ती एका कंपनीत नोकरी करत आहे. दोघांनाही वर्क फ्रॉम होम आहे. त्यामुळे दोघे 24 एकत्र राहू लागले. परिणामी, त्यांच्यात भांडण झाले. त्याने तिला घरातून बाहेर जायला सांगितले. ती माहेरी निघून गेली. वास्तविक तिला संसार करायचा असून, त्याला केवळ समज देण्याची इच्छा आहे.
दुसऱ्या प्रकरणात उच्चशिक्षित दांपत्य आहे. पतीने तिला मारहाण केली. त्यामुळे ती माहेरी निघून गेली आहे. मुलगा लहान आहे. ती मुलाच्या भवितव्याचा विचार करत आहे. त्याच्या मनावर परिणाम होऊ नये, यासाठी तिला पोलिसांतही जायचे नसून, बाहेरच सामंजस्याने हे प्रकरण मिटावे, असे वाटते. एक नव्हे, अशी अनेक प्रकरणे वकिलांकडे सल्ल्यासाठी येत आहेत. विशेषत: दारू विक्री सुरू झाल्यापासून अशा प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.
रागासाठी बायको लक्ष्य?
वाढलेली महागाई, सुधारलेले राहणीमान, आजारपण, गावी घरच्यांना पाठवायचे असलेले पैसे, कुणी घर, कुणी गाडीसाठी काढलेले कर्जाचे हप्ते भरणे अवघड बनले आहे. त्यातच आता मद्याची दुकाने उघडी असून, अनेकजण मद्यप्राशन करून घरी जाऊन पत्नीला मारहाण, शिवीगाळ करत आहे. एकंदरित निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीचा आणि तणावाचा राग बायकोवर पतिदेव काढत असल्याचे चित्र दिसत आहे.
सध्या आर्थिक समस्या निर्माण होणार असून, मानसिकदृष्ट्या तणाव येणार आहे. अशा परिस्थितीत पती-पत्नीने एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. संसारातील ही कसोटी आहे.
– ऍड. सुनिता जंगम, सचिव, दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन, पुणे.