नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली. या लॉकडाऊनच्या काळात घरगुती हिंसाचारांच्या घटनांमध्ये ९५ टक्क्यांनी वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाने देशव्यापी लॉकडाऊनच्या २५ दिवसांमध्ये देशातील वेगवेगळ्या शहरांमधून आलेल्या तक्रारींच्या आधारे हा दावा केला आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार महिलांवरील घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये जवळजवळ दोनपटीने वाढ झाली आहे. महिला आयोगाने २७ फेब्रुवारी ते २२ मार्च दरम्यान आणि २३ मार्च ते १६ एप्रिल या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये प्राप्त झालेल्या तक्रारींची तुलना केली. त्यानंतर महिला आयोगाने ही आकडेवारी जाहीर केली.
लॉकडाऊनच्या पूर्वी घरगुती हिंसाचाराच्या १२३ तक्रारी प्रात्त झाल्या होत्या. तर लॉकडाऊनच्या दरम्यान ऑनलाईन आणि अन्य माध्यमातून घरगुती हिंसाचाराच्या २३९ तक्रारी दाखल करण्यात आल्या असल्याचे आयोगाने सांगितले.
लॉकडाऊनच्या पूर्वी २५ दिवसांमध्ये आलेल्या तक्रारींमध्ये ११७ महिलांनी भेदभावाचा आरोप केला आहे. तर, लॉकडाऊन दरम्यान, १६६ तरुणी/ महिलांनी समाजात आणि कुटुंबात सन्मानासोबत जगण्याच्या अधिकाराबद्दल बोलले. त्याचसोबत लॉकडाऊनपूर्वी सायबर गुन्हेगारीच्या ३९६ तक्रारी आल्या होत्या तर, लॉकडाऊननंतर ५८७ तक्रारी आल्या असल्याचे महिला आयोगाने सांगितले.