मंचर (पुणे) – अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील हिंगे यांच्या घरात असलेल्या गॅस सिलेंडरने पेट घेतला. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखत टाकी बाहेर आणून ठेवल्याने मोठा अनर्थ टळला.
अवसरी बुद्रुक येथे भरवस्तीत स्वप्नील हिंगे यांचे घर आहे. रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या आईने स्वयंपाक केला, भाकरी करणे बाकी असताना गॅस टाकी संपल्याने त्यांनी मुलगा स्वप्निलला बोलून घेतले व दुसरी टाकी बसवण्यासाठी सांगितले. स्वप्नीलने दुसरी टाकी बसविल्यानंतर दोन मिनिटातच गॅसने पेट घेतला, सुरुवातीला नळीपासून रेग्युलेटरपर्यंत पेट घेत हळूहळू गॅसवर आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. स्वप्निल हिंगे यांचे आई व आजूबाजूचे सगळे घाबरलेल्या अवस्थेत असताना देखील स्वप्नील हिंगे यांनी कोणतीही तमा न बाळगता प्रसंगावधान राखत शेगडी व टाकी उचलून तात्काळ बाहेर मोकळ्या जागेत आणली. हवा लागल्याने आणखीनच ज्वाला भडकू लागल्या, ज्वाला रेगयुलेटरमध्ये येऊन नळी सटकून फक्त गॅसचा भडका होत राहिला. त्यांनी त्याही स्थितीत सिलेंडर उचलून घराच्या बाजूला असलेल्या बाजार तळावर आणून ठेवला. गॅसचा भडका वाढू लागल्याने हळूहळू त्यातला गॅस संपला, यात कोणताही स्फोट वगैरे न झाल्याने मोठी हानी टळली आहे. गॅस एजन्सीवाले गॅस देताना कोणत्याच ग्राहकाला गॅस चेक करून देत नाही. स्वप्नील हिंगे यांच्या म्हणण्यानुसार या गॅस टाकीमध्ये बहुधा रबरी पॅकिंग नसल्याने हा गॅस पेटला असावा. त्यानंतर त्यांनी तात्काळ कळंब येथील साक्षी गॅस एजन्सीला झालेला प्रकार कळविला.
गॅस एजन्सीवाले कोणत्याही ग्राहकाला गॅस चेक करून देत नाहीत. गॅस टाकीचे वजन केले जात नाही. याबाबत प्रशासनाने लक्ष घालावे, अशी ग्राहक मागणी करत आहेत. दीड वर्षांपूर्वी अवसरी बुद्रुक मध्ये शेटे गुणगे मळ्यात असाच गॅसने पेट घेतला होता. अशा घटना होऊनसुद्धा गॅस वितरक ग्राहकांना शासनाने दिलेल्या सोयी पुरवत नसल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.