नगर (प्रतिनिधी) – पेट्रोल, डीझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे मोदी सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत पेट्रोल पंपावरील फलकाखाली चूल मांडून आंदोलन करण्यात आले.
गॅसची वाढीच्या निषेधार्थ ‘राष्ट्रवादी’च्या शहर-जिल्हाध्य्क्षा रेश्मा आठरे यांच्या नेतृत्वाखाली मोदींच्या पेट्रोलपंपावरील फलकाखाली केंद्र सरकारविरोधी निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या एकाच महिन्यात सर्वप्रथम 4 फेब्रुवारी 2021 रोजी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी पुन्हा 50 रुपयांची वाढ करण्यात आली. आता तिसर्यांदा एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ झाली आहे. नव्या दरवाढीमुळे आता 14. 2 किलोग्रॅम एलपीजी गॅस खरेदीसाठी ग्राहकांना 769 रुपये मोजावे लागणार आहेत.
तीन फेब्रुवारी रोजी 794 रुपये इतके होते. मुंबईत एलपीजी गॅस सिलिंडरसाठी नागरिकांना 794 रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान, चूल मांडा आंदोलनात महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला असून हा उद्रेक दिल्लीपर्यंत पोहचवून केंद्र सरकारला धडा शिकल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेश्मा आठरे यांनी म्हटले आहे. यावेळेस अपर्णा पालवे, लता गायकवाड, शीतल राऊत, सुनिता पाचारने, शीतल गाडे, उषा सोनटक्के, आलिशा गर्जे, शोभा तांदले आदी उपस्थित होत्या.
तीन महिन्यांत 200 रुपयांची वाढ
‘‘गेल्या तीन महिन्यांत एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 200 रुपयांनी वाढ झाली. डिसेंबरमध्ये गॅस सिलिंडरचा भाव 644 रुपयांवर पोचला. एक जानेवारी रोजी पुन्हा 50 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे 644 रुपयांवरून सिलिंडरचा दर 694 रुपये इतका झाला.
चार फेब्रुवारी रोजी पुन्हा वाढ झाल्याने हा भाव 719 रुपये इतका झाला. 15 फेब्रुवारी रोजी पुन्हा दरवाढ होऊन 719 रुपयांवरून 769 रुपये इतका झाला. त्यानंतर आज पुन्हा 25 रुपयांची वाढ झाली आहे. केंद्र सरकारला महागाई कमी करणे जमत नसेल तर त्यांनी खुर्च्या खाली कराव्यात,’’ असे रेश्मा आठरे म्हणाल्या.