Uddhav Thackeray : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांनंतर स्थानिक राजकारणात मोठ्या हालचालींना वेग आला असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. डोंबिवलीत ठाकरे सेनेचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी स्थानिक नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या घडामोडीमुळे डोंबिवलीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रकाश तेलगोटे यांनी पक्ष सोडण्यामागे महत्त्वाची कारणेही स्पष्ट केली. पक्षातील वरिष्ठ नेत्यांची मनमानी, कार्यकर्त्यांकडे होणारे दुर्लक्ष आणि निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याची भावना वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, भाजपमध्ये मोठ्या संख्येने झालेल्या या प्रवेशामुळे पक्षाची ताकद डोंबिवलीत वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड भाजपसाठी महत्त्वाची मानली जात आहे. यापूर्वीही ठाकरे गटाला धक्का बसला होता. ठाकरे सेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक मधुर म्हात्रे यांना पक्षविरोधी कारवायांमुळे हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या सततच्या घडामोडींमुळे ठाकरे गटातील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर येत असल्याचे चित्र आहे. एकूणच, डोंबिवलीतील या मोठ्या पक्षांतरामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात झाली असून आगामी काळात त्याचे दूरगामी परिणाम पाहायला मिळू शकतात.