मुंबई – अमेरिकेच्या अध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर इतर सर्व चलनाच्या तुलनेत डॉलर पधारत आहे. अशा परिस्थितीत गेल्या दहा दिवसात भारतीय रुपयाच्या मूल्यावर बराच नकारात्मक परिणाम झाला आहे. मंगळवारी रुपयाचा दर पुन्हा एक पैशाने कमी होऊन 84 रुपये 39 पैसे प्रति डॉलर या नव्या निचांकी पातळीवर गेला.
रिझर्व बँक हस्तक्षेप करत असूनही परकीय चलन साठा वेगाने कमी होत असल्यामुळे रुपया कमकुवत होत आहे. जगातील सहा प्रमुख चलनाच्या तुलनेत डॉलर वधारून आता डॉलर इंडेक्स 105.60 या चार महिन्याच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे. एकीकडे डॉलर वधारत असतानाच परदेशी गुंतवणूकदार भारतातून गुंतवणूक काढून घेत असल्यामुळे रुपयांच्या मूल्यावर दबाव येत आहे. गेल्या पाच दिवसात तर रुपयाचे मूल्य तब्बल 25 पैशनी कमी झाले आहे.
त्यामुळे या आघाडीवर चिंता करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान स्टेट बँकेच्या अभ्यास अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की. एकूण परिस्थिती पाहता केंद्र सरकार रुपयाचे मूल्य आठ ते दहा टक्क्यांनी घसरू देणार आहे. एकूण जागतिक चलन बाजारातील परिस्थिती पाहता रुपयाचे अवमूल्यन होणे गरजेचे आहे असे समजले जाऊ लागले आहे. त्यामुळे निर्यात माढण्यास मदत होईल. मात्र आयातीचा खर्च वाढणार आहे.
डॉलरच्या मजबुतीने परदेशी गुंतवणुकीच्या बाह्य प्रवाहाला चालना दिली असून त्यातून रुपया आणखी खोलात लोटला जात आहे. ट्रम्प यांचे व्हाइट हाऊसमधील पुनरागम हे रुपयाच्या मूल्यात 8-10 टक्क्यांच्या र्हासास कारण ठरेल. ट्रम्प पहिल्यांदा अमेरिकेचे अध्यक्षपदी आले तेव्हा त्यांच्या चार वर्षाच्या राजवटीत रुपयाचे मूल्य 11 टक्क्यांनी गडगडले होते, त्या तुलनेत यंदाची घसरण ही तुलनेने अल्प असेल. शिवाय रुपयाच्या 5 टक्के अवमूल्यनाचा महागाईवाढीच्या दृष्टीने पाव ते अर्धा टक्के म्हणजे किरकोळच असेल, असाही अहवालाचा दावा आहे.
ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिकेतील पतधोरण आयुधांच्या वापराची व्याप्तीही मर्यादित केली जाईल. हे घटक डॉलरच्या मजबुतीसाठी आणखीच उपकारक ठरतील.