व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून मित्रासाठी ‘डोळस मदत’; मित्राचा दुसरा डोळा वाचवण्यासाठी पुढाकार

डोर्लेवाडीत लाखांची रक्‍कम जमा

डोर्लेवाडी (वार्ताहर)- बारामती तालुक्‍यातील डोर्लेवाडी येथील संतोष मच्छिंद्र हरिहर यांना एप्रिल महिन्यात करोनाची बाधा झाली. हरिहर यांना बारामती येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

बारामती येथील रुग्णालयात उपचार घेत असताना मधुमेह असल्याने औषध गोळ्यांची बाधा होऊन त्यांचा एक डोळा निकामी झाला. दुसरा डोळा वाचविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च लागणार होता. मात्र, संतोष हरिहर यांची परिस्थिती हलाखीची असून तो टीव्ही, रेडिओ रिपेअर करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मग डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसे आणाचे कोठून, असा प्रश्‍न हरिहर कुटुंबासमोर उभा राहिला होता. अशावेळी गावातीलच तरुणांनी एकत्र येत व्हाट्‌सअप ग्रुपच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले.

अवघ्या एका दिवसात लाखोंची मदत जमा झाली. त्याच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया गावातील मित्र मंडळीमुळे यशस्वी पार पडली. यासाठी डोर्लेवाडी, झारगडवाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते रमेश मोरे, संतोष नेवसे, अजित जाधव, अजित वामन, दादा दळवी, संतोष काळेबेरे, सोमनाथ भिले, नवनाथ बोरकर, मंगेश कचरे, मच्छिंद्र टिंगरे, गोरख जाधव यांनी मोलाची
मदत केली.

माझ्या मुलाला बाधा झाल्यानंतर त्याला गोळ्या इंजेक्‍शनमुळे डोळ्याला साइडइफेक्‍ट झाला. त्यामुळे त्याचा एक डोळा निकामी झाला. डोळ्यावर लवकर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. यासाठी लाखो रुपयांचा खर्च लागणार होता. तो आमच्याकडे नसल्याने शस्त्रक्रिया रखडली होती. ग्रामस्थांनी पैशांची मदत केल्याने माझ्या मुलाच्या डोळ्याची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. मदत करणाऱ्यांच्या उपकाराची परतफेड या जन्मी तरी करणे शक्‍य नाही.
– मच्छिंद्र हरिहर, डोर्लेवाडी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.