डॉल्बीचा ‘आवाज’ बंदच; सनबर्न फेस्टिव्हलवरही बंदी?

पुणे – “गणेशोत्सवात सध्या 4 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकास परवानगी आहे. ही परवानगी सहा दिवसांपर्यंत वाढविण्यासाठी प्रशासनाबरोबर चर्चा करण्यात येईल. डॉल्बीबाबत मात्र आधी प्रबोधन करू. मात्र, तरीही वापर केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील,’ असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे जाहीर केले.

विघ्नहर्ता न्यास आणि पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित गणेशोत्सव मंडळांच्या पारितोषिक कार्यक्रमात पाटील बोलत होते. यावेळी महापौर मुक्‍ता टिळक, खासदार गिरीश बापट, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, महापालिकेच्या रुबल अग्रवाल, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, “घातपाताची शक्‍यता लक्षात घेता देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे. प्रबोधनाबरोबच कायद्याच्या चौकटीत राहून उत्सव साजरा करावा. कार्यकर्त्यांच्या तक्रारी लक्षात घेता, इतर दिवशी रात्रभर डॉल्बी लावणाऱ्यांवर पोलीस आयुक्तांनी कारवाई करावी. तसेच सनबर्न उत्सव यापुढे चालणार नाही, अशी सूचनाही आयुक्तांना करण्यात येत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सह पोलीस आयुक्‍त रवींद्र शिसवे व डॉ. मिलींद भोई यांनी केले.

टिळक रस्त्यावर संचारबंदीसारखी परिस्थिती नको
गणेश विसर्जन मिरवणुकीत टिळक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डॉल्बी व डीजे वाजविणारी मंडळे येतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनानुसार रात्री 12 वाजेनंतर आवाजाला बंदी आहे. या रस्यावरील मंडळांच्या कार्यकर्त्यांची संख्याही शेकडोंमध्ये असते. यामुळे पोलिसांना मोठा फौजफाटा घेऊन रस्त्यावर उतरावे लागते. साऊंड बंद केल्यावर मंडळे रस्त्यावरच ठिय्या मांडतात. यामुळे अनेकदा तणावपूर्व परिस्थिती निर्माण होते. ही बाब काही कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून देत टिळक रस्त्यावर संचारबंदीसारखी परिस्थिती करू नये, असे सांगितले.

गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या भावना व सूचना लक्षात घेता उत्सव हा उत्सवाप्रमाणेच साजरा करू. यादरम्यान कायदा-सुव्यवस्थेच्या दुष्टीने गर्दी नियंत्रणासाठी मंडळांशी चर्चा करण्यात येईल. उत्सवामध्ये सुरक्षाही महत्वाची असणार आहे.
– डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस आयुक्‍त

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.