मुंबई – कायदे आणि नियमांनुसार आखून देण्यात आलेल्या सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी ज्यांनी करणे आवश्यक आहे तेच त्यांचे पूर्णपणे पालन करत नाहीत, हे भारतातले वास्तव असून रस्ते सुरक्षेच्या बाबतीत आपल्याकडे खूपशा तडजोडी केल्या जातात. केंद्रीय मोटार वाहन (आठवी सुधारणा) नियम 2020 च्या नियम क्रमांक 138 नुसार सर्व वाहनांमध्ये प्रथमोपचार पेटी आणि त्यामध्ये काही विशिष्ट सामग्री असणे अनिवार्य आहे. परंतु वाहन उत्पादक कंपन्या या नियमाची सर्रास पायमल्ली करत आहेत. त्यामुळे तातडीच्या वेळी वैद्यकीय मदत मिळेपर्यंत प्रथमोचार करताच येत नाहीत, असे मुंबई पोलिसांच्या रस्ते सुरक्षा सल्लागार समितीच्या सदस्य मंगल गोगटे यांनी म्हटले आहे.
32 व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहाचा सर्व सुरक्षा उपाययोजनांचे आणि वाहतुकीच्या सर्व नियमांचे नेहमी पालन करा, हा प्रमुख विषय ठरवण्यात आला आहे. त्यानिमित्त इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड इकॉनॉमिक चेंज या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवालही प्रसिद्ध करण्यात आला. त्यावेळी गोगटे बोलत होत्या.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये सुधारणा केल्या आणि सर्व मोटार वाहनांमधील प्रथमोपचार पेटीमध्ये फेरॅक्रीलम हे रक्तस्राव रोखणारे औषध असावे अशी सूचना केली. असे असून देखील सियाम (एसआयएएम) या वाहन उत्पादकांच्या सर्वात मोठ्या संघटनेने मात्र जीवनरक्षक हेमोस्टॅटीक जेलचा प्रथमोपचार पेटीमध्ये समावेश करण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे.
1 एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आलेल्या सध्याच्या राजपत्रित सूचनेनुसार दुचाकीमधील प्रथमोपचार पेटीमध्ये निर्जंतुक (स्टर्लाइज्ड) कापसाचे किंवा रेशमी पारदर्शक कापड, औषधी वॉश प्रूफ प्लास्टर, रोल केलेले कापसाचे किंवा रेशमाचे तलम पारदर्शक कापड (नॉन स्टेराईल), लवचिक, चिकटू शकेल अशी फॅब्रिक टेप (निर्जंतुकीकरण केलेली), लवचिक फॅब्रिक, सेटरिमाइड क्रीम, फेरॅक्रीसिलम जेल 1% आणि पीव्हीसी पाउच असले पाहिजे.
भारतामध्ये 1999 सालापासून मोटार वाहनांमध्ये प्रथमोपचार पेटी असणे अनिवार्य करण्यात आले. परंतु आज दोन दशकांनंतर देखील दुचाकींमधील प्रथमोपचार पेटीसंदर्भात काटेकोर पालनाला वाहन उद्योगक्षेत्राकडून विरोध केला जात आहे. मोटार वाहन सुरक्षा नियमांमध्ये ज्यासाठी सुधारणा केल्या गेल्या त्या सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेकडे यामुळे दुर्लक्ष होत आहे.
वाहनचालक आणि प्रवाशांची सुरक्षा अबाधित राखणे हा प्रथमोपचार पेटीचा उद्देश असतो. अपघात किंवा इतर आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास डॉक्टरांची मदत पोहोचेस्तोवर पहिल्या काही मिनिटात (अति महत्त्वाचा काळ – “गोल्डन अवर’) जखमींना तातडीची वैद्यकीय मदत पुरवण्याची व्यवस्था वाहनामध्येच असणे अत्यावश्यक आहे. दुर्दैवाने काही अपघात झाल्यास प्रथमोपचार पेटीतील सामग्रीच्या मदतीने पहिल्या काही मिनिटातच जखमी व्यक्तीला तातडीचे प्रथमोपचार दिले गेल्यास त्याची तब्येत, जखमा खालावण्यापासून बचावले जाऊ शकते, त्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यात प्रथमोपचार पेटी खूप मोठी भूमिका बजावू शकते. कापणे, खरचटणे यासारख्या कोणत्याही प्रकारच्या जखमांवर प्रथमोपचार पेटीतील सामग्रीच्या मदतीने उपचार केले जाऊ शकतात तसेच अति रक्तस्राव होण्यापासून रोखले जाऊ शकते.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नियुक्त केलेल्या डॉक्टरांच्या एका उच्च स्तरीय समितीने शिफारस केली आहे की, सर्व मोटार वाहनांच्या प्रथमोपचार पेटीमध्ये फेरॅक्रीलमचा समावेश असावा. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या सांगण्यावरून आरोग्य मंत्रालयाने या समितीची नियुक्ती केली होती. फेरॅक्रीलममध्ये प्रतिजैविक क्षमतांबरोबरीनेच रक्तस्राव रोखण्याची देखील क्षमता असल्याने त्याचा समावेश प्रथमोपचार पेटीमध्ये असला पाहिजे असे या समितीने सांगितले होते.
हेमोस्टॅट्स ही औषधे रक्त गोठवण्याचे काम करतात आणि त्यामुळे रक्तस्राव रोखला जातो. फेरॅक्रीलम हे एक प्रकारचे हेमोस्टॅट आहे जे 1992 च्या सुमारास भारतात व्यापारी उपयोगासाठी आणले गेले. विविध सरकारी एजन्सीज, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आणि खाजगी संघटनांमध्ये याचा वापर केला जातो.